रोहित पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार | तासगाव – कवठेमहांकाळ’चे मैदान मारण्यासाठी सज्ज : पदयात्रा, सभा घेऊन करणार शक्तिप्रदर्शन

0
20

तासगाव : तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून युवा नेते रोहित पाटील आज (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तासगाव शहरातून पदयात्रा काढून तहसील कार्यालयासमोर त्यांची सभा होणार आहे.पदयात्रा व सभेच्या माध्यमातून ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. दरम्यान, तासगाव कवठेमहांकाळचे मैदान मारण्यासाठी रोहित पाटील समर्थक पूर्ण ताकतीने मैदानात उतरले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातही ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे. या मतदारसंघात सध्या स्व. आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या प्रतिनिधित्व करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून स्व. आर. आर. पाटील यांच्या कुटुंबातच आमदारकी राहिली आहे.

दरम्यान, आपल्या वयाची पंचविशी पूर्ण केल्यानंतर रोहित पाटील पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात नेमके कोण आव्हान उभे करणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र विरोधक कोणीही असो… तो छोटा असो की मोठा असो… या निवडणुकीत विजय आपलाच होईल, असा विश्वास रोहित पाटील यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.

दरम्यान, रोहित पाटील उद्या (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ते तासगाव शहरातून पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर सभा घेतली जाणार आहे. पदयात्रा व सभेच्या माध्यमातून मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून रोहित पाटील यांनी आमदार सुमन पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मतदार संघातील विविध समस्यांबाबत काम केले आहे. मतदारसंघातील विविध कामांची निवेदने घेऊन ते नेहमीच मुंबई व दिल्ली येथे हेलपाटे घालताना दिसून आले. सत्ता असताना व नसतानाही त्यांनी स्व. आर. आर. पाटील यांच्या संबंधाचा फायदा घेत विरोधी गटातील मंत्र्यांनाही भेटून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात ते गेले अनेक वर्षे काम करीत आहेत. 2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मतदारसंघात चांगली मोर्चेबांधणी केली आहे. युवकांची फळी उभारली आहे. जुन्या जाणत्या लोकांना एकत्रित घेऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले जात आहेत.

रोहित पाटील यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे प्रमुख विरोधक असतील, अशी चर्चा आहे. दरम्यान, तासगाव – कवठेमहांकाळची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असल्याने संजय पाटील यांनी हातात ‘घड्याळ’ बांधण्याची भूमिका घेतली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीकडून प्रभाकर पाटील अथवा ऐनवेळी माजी खासदार संजय पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे तासगाव – कवठेमहांकाळची यावेळची निवडणूक अतिशय रंगतदार, काट्याची होणार आहे, हे मात्र नक्की.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here