*तासगाव – कवठेमहांकाळमधून लढणार? : अजितराव घोरपडे यांचाही पाठिंबा*
तासगाव : (अमोल पाटील) महायुतीच्या जागा वाटपात तासगाव – कवठेमहांकाळची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली आहे. त्यामुळे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी हातात ‘घड्याळ’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे संजय पाटील यांचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’ जवळपास निश्चित झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांच्याविरोधात ते स्वतः मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील व संजय पाटील गटातील संघर्ष पुन्हा पेट घेणार आहे. दरम्यान, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही संजय पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रोहित पाटील यांचा प्रवास खडतर बनला आहे.
आर. आर. पाटील व संजय पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने जवळून पाहिला आहे. दोघांच्या संघर्षामध्ये नेहमीच आर. आर. पाटील यांचा विजय तर संजय पाटील यांचा पराभव होत आला आहे. दरम्यान, दोघांच्या संघर्षात तालुक्याची राखरांगोळी झाली. मतदारसंघाचा विकास खुंटला. दोन्ही गटांच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नव्हता, अशी एकेकाळी स्थिती होती.
दरम्यान, मतदारसंघाच्या विकासाच्या गोंडस नावाखाली दोघांनीही एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. एकत्रिकरणात संजय पाटील यांना विधानपरिषद देण्यात आली. मात्र दोघांमधील तंटामुक्ती अवघी सहा वर्षे टिकली. विधान परिषदेची सहा वर्षे संपल्यानंतर संजय पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्यापासून फारकत घेतली. भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गेली दहा वर्षे ते भाजपमधून सांगलीचे खासदार होते. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीतील पराभव संजय पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला वारंवार राजकीयदृष्ट्या मदत केली. तरीही हे कुटुंब लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले, याचे शल्य संजय पाटील यांच्या मनात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याचा बदला घेण्याची तयारी त्यांनी केली आहे. रोहित पाटील यांना त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत पराभूत करायचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून संजय पाटील यांची राजकीयदृष्ट्या जुळवाजुळव सुरू आहे.
महायुतीच्या जागा वाटपात तासगाव – कवठेमहांकाळची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली आहे. त्यामुळे संजय पाटील यांनी हातात ‘घड्याळ’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश निश्चित झाला आहे. नुकतीच त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन तासगाव – कवठेमहांकाळमधून लढण्याचे संकेत दिले आहेत. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्यासमोर संजय पाटील स्वतः उभे राहतील, अशी चर्चा आहे. जर संजय पाटील उभे राहिले नाही तर त्यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे यांचा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. अजितराव घोरपडे हे माजी राज्यमंत्री आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात त्यांचे वलय आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेटपणे संजय पाटील यांना विरोध करीत विशाल पाटील यांना मदत केली होती. त्याचा जबर फटका संजय पाटील यांना बसला. त्यामुळे आता घोरपडे यांना सोबत घेऊन रोहित पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यासाठी संजय पाटील अजितराव घोरपडे व अजित पवार यांची संयुक्तिक बैठक झाली आहे.
बैठकीमध्ये रुसवे – फुगवे काढण्यात आले आहेत. घोरपडे व पाटील यांच्यामधील राजकीय वाद संपुष्टात आणला आहे. तर अजितराव घोरपडे यांना विधान परिषदेचा शब्द दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे घोरपडे राष्ट्रवादीमध्ये डेरे दाखल झाले आहेत. आगामी निवडणुकीत ते संजय पाटील यांना पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे तासगाव – कवठेमहांकाळची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याचे संकेत आहेत.