बार्शी : लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलाचे चौघांनी अपहरण करून कारमधून पळवून नेण्याचा प्रकार घडला. परंतु, बार्शी बायपासवर पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे त्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही घटना दि. २२ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर येथील सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांनी तातडीने बार्शी तालुका पोलीस स्टेशनला अपहरणाच्या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संशयास्पद कार अल्पवयीन मुलाला घेऊन बार्शीच्या दिशेने निघाली आहे. यानंतर बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून बार्शी बायपासवर नाकाबंदी लावली. थोड्याच वेळात पोलिसांनी संशयास्पद पांढऱ्या रंगाची कार भरधाव येताना पाहिली पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु कार चालकाने वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
यामुळे पोलिसांनी पुढे रोडवर वाहने आडवी लावून कारला थांबवले. कारमध्ये एक १७ वर्षीय मुलगा भेदरलेल्या अवस्थेत आढळला. त्याने सांगितले की, गाडीतील चौघेजण त्याचे अपहरण करून पळवून नेत होते.अटक केली असून, त्यांची नावे मुन्ना कांबळे, तुकाराम साळुंखे, मंगेश वंजारी आणि शंकर कोयाळकर अशी आहेत. सर्व संशयित आरोपी लातूरचे रहिवासी आहेत. ही कारवाई उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे आणि त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोहेकॉ राजेंद्र मंगरुळे, पोहेकॉ धनराज केकाण, पोहेकॉ सुभाष सुरवसे, पोकॉ राहुल बोंदर, पोकॉ शिवशंकर खराडे, पोकॉ ओमप्रकाश दासरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.