तासगाव : भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी स्वार्थासाठी गट आणि पक्ष बदलला आहे. लोकहित बाजूला ठेवून आजपर्यंतची त्यांची कारकीर्द आहे, अशी टीका राष्ट्रवादीशी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी केली. तर माझ्या वडिलांविरुद्ध जे लढले तेच आज माझ्या विरोधात लढत आहेत, अशीही टीका पाटील यांनी केली.
तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे मी मतदार संघात काम करत आहे. लोकांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. अनेक लोकांना लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत समोर कोणीही असले तरी सामान्य लोकच मला तारतील.
अजितराव घोरपडे व संजय पाटील एकत्र येत असल्याच्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले, ही सगळी मंडळी एकत्रित का येत आहेत, मला माहित नाही. पण, माझा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांच्या सद्सद् विवेक बुद्धीवर विश्वास आहे. कोणीही कितीही एकत्रित आले तरी सामान्य मतदारच मला तारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर माझ्या वडिलांविरुद्ध ज्यांनी अनेक निवडणुका लढवल्या तेच आज माझ्या विरोधात लढायला सज्ज झाले आहेत, असाही टोला रोहित पाटील यांनी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांना लगावला.