– जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 च्या मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजीचे 17.00 वाजल्यापासून ते दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजीचे 23.59 पर्यंत व दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजीचे 00.01 पासून ते 23.59 पर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मद्य व ताडी विक्रीच्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई / कोरडा दिवस जाहीर करण्याबाबतची तरतूद लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री मनाई/ कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत तरतूद आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतदान प्रक्रिया दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. तसेच मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मद्य व ताडी विक्रीच्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
ही निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये जिल्हाधिकारी यांना असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानाच्या अनुषंगाने दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजीचे 17.00 वाजल्यापासून ते दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजीचे 23.59 पर्यंत व मतमोजणीच्या अनुषंगाने दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजीचे 00.01 पासून ते 23.59 पर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मद्य व ताडी विक्रीच्या आस्थापना (सीएल-2, सीएल-3, सीएलएफएलटिओडी 3, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, एफएलबीआर-2, फॉर्म ई-2. टिडी-1) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
दुचाकी वाहनांकरिता नवीन मालिका सोमवारपासून
सांगली : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगलीकरिता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई एल ही नवीन मालिका सोमवार, दि. 28 ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी दिली.
एम एच 10 ई एल या मालिकेव्यतिरीक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.