सांगली : महाविकास आघाडीत मिरज मतदारसंघावरून वाद पेटला आहे. हा मतदारसंघ आपल्याच वाट्याला येणार, असे गृहीत धरून तयारी केलेल्या काँग्रेसची शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने कोंडी केली आहे. ‘मिरज आम्हालाच हवे,’ अशी दोन्ही पक्षांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांना दिल्लीपर्यंत धडक द्यावी लागली आहे.
दरम्यान, सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यायची, हा वाददेखील आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. विश्वजित, विशाल दिल्लीत पोहोचले आहेत. ते पक्षाच्या वरिष्ठांसमोर सांगलीतील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करतील. त्यानंतर ‘प्रदेश’चे नेते आणि राष्ट्रीय समिती त्यावर निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांच्या समर्थकांचे दिल्लीकडे डोळे लागले आहेत.