भाजपाची मुलख मैदान तोफ असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिली सभा जतमध्ये घेणार आहेत. या पहिल्या सभेनंतर फडणीस यांच्या राज्यभरातील सभांना सुरुवात होणार आहे.जतमध्ये स्थानिक भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकर असा उभा संघर्ष सुरू आहे.
यात भूमिपुत्र म्हणून स्थानिक भाजप नेत्यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे.त्यामुळे जत मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच थेट उपमुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यातील टॉपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस हे जतमध्ये पहिली जाहीर सभा घेणार आहेत.इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या ताकतीचा नेता तेही राज्यातील प्रथम सभा जतमध्ये घेत आहे. त्यामुळे जतकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले थेट राज्यातील विरोधातील नेत्यांना अंगावर घेण्यात प्रसिद्ध असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना अचानकपणे जत विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यात आले आहे.
येथे भाजपकडून तम्मणगौडा रवीपाटील व प्रकाशराव जमदाडे इच्छुक होते.मात्र स्थानिकांना डावलून थेट आटपाडी येथील व विधानपरिषदेचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांना तिकीट देऊन भाजपने मोठी रिस्क घेतली आहे.त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडून आणणे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रतिष्ठेचे झाले आहे.त्यामुळे त्यांनी पहिली सभा जत सारख्या दुष्काळी भागात घेणार आहेत.सभेची तयारी पडळकर समर्थकांकडून जोरदारपणे सुरू आहे.या सभेनंतर जतमधील बंड शमून भाजप एकसंघने प्रचारात उतरेल का?हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दरम्यान जतमध्ये देवेंद्र फडवणीस यांची तोफ धडाडणार आहे.
६ नोव्हेंबरला होणार सभा
जत शहरातील एसआरव्हीएम हायस्कूलच्या मैदानावर सकाळी १०.०० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे.या सभेला लाखापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असेल अशी माहिती महादेव हिंगमिरे यांनी दिली.