राज्यातील अनेक विधानसभा मतदार संघात बंडखोरांचे आव्हान अद्यापही कायम असून महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाकडून त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता, मात्र अजूनही अनेक बंडखोर माघारी घेत नसल्याने त्यांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी जे बंडखोर अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले जातील, अशी आक्रमक भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.
सोमवारी अनेक जण अर्ज मागे घेण्यास तयार झाले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पक्षातील निष्ठावंत अर्ज मागे घेतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.दरम्यान सांगलीतील शिराळा,खानापूर-आटपाडी येथील बंड शमविण्यात पक्षाला यश आल्याचे चित्र आहे.मात्र जत विधानसभा मतदार संघात बंडखोर अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.सोमवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे जतमधिल बंडखोरी टळणार का?हे उद्या तीननंतर स्पष्ट होणार आहे.