तासगाव : तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटप होत असल्याचा प्रकार संजय पाटील समर्थकांनी चव्हाट्यावर आणला. रविवारी सायंकाळी तासगाव येथील साठेनगर भागात दिवाळीच्या फराळासोबत प्रत्येक कुटुंबामध्ये तीन हजार रुपयांचे पाकीट वाटप करण्यात येत होते. याप्रकरणी सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील व बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी : तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. राज्यातील अतिशय अटीतटीची ही लढत असणार आहे. त्यामुळे अवघ्या राज्यभराचे या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. दोन्हीही गटांकडून विजयासाठी साम – दाम – दंड – भेद या नीतीचा अवलंब करण्यात येत आहे.
दरम्यान, रोहित पाटील हे रविवारी सायंकाळी तासगाव येथील साठेनगर भागात आपल्या कार्यकर्त्यांसह रॅली काढत होते. या रॅलीच्या पाठीमागून खंडू कदम व सचिन पाटील हे दोघेजण दिवाळीचा फराळ व प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पाकीट एका कुटुंबामध्ये देत होते. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर संजय पाटील समर्थक त्या ठिकाणी गेले. त्यांनी हे पैसे वाटप होत असल्याचे रंगेहात पकडले. यावेळी खंडू कदम हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तर सचिन पाटील यांना पकडून कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याकडे आणले.
तत्पूर्वी हे पैसे नेमके कोणासाठी वाटप करण्यात येत होते, याची माहिती संजय पाटील समर्थकांनी घेतली. यावेळी सचिन पाटील यांनी हे पैसे खंडू कदम यांनी आणले आहेत, आणि आता ते साठे नगर भागातील सुमारे 227 कुटुंबांमध्ये वाटप करण्याचे चालू आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये दिवाळीचा फराळ व तीन हजार रुपयांचे पाकीट, असे वाटप करण्याचे ठरले आहे. आतापर्यंत सुमारे शंभर कुटुंबांमध्ये हे पैसे व फराळाची पाकीट वाटप केले आहे, असे व्हिडिओमध्ये कबूल केल्याचे दिसून येत आहे. तर हे पैसे रोहित पाटील यांच्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाला मतदान करण्यासाठी आम्ही देत असल्याचेही सचिन पाटील यांनी कबूल केले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. निवडणूक आयोगाचे शिवप्रसाद भिसे हे आपल्या स्टाफसह तासगाव येथील साठेनगर भागात आले. मात्र तोपर्यंत पैसे वाटप करणाऱ्यांना संजय पाटील समर्थकांनी तासगाव पोलीस ठाण्यामध्ये आणले होते. पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. रोहित पाटील समर्थक मते विकत घेत आहेत. त्यासाठी पैशाचे वाटप करत आहेत, ही बातमी मतदारसंघासह राज्यभर वाऱ्यासारखी पसरली.
निवडणूक विभागातील शिवप्रसाद भिसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन पाटील व खंडू कदम या दोन्ही रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 3 हजार रुपये असणारी 16 पाकिटे असे 48 हजार, 500 रुपयांच्या 111 नोटा असे 55 हजार 500 रुपये व एक मोबाईल असा सुमारे 1 लाख 8 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, हा प्रकार समजताच संजय पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची त्यांनी भेट घेतली. तर या पैसे वाटप प्रकरणाची आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस व निवडणूक विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. त्यानंतर स्मिता पाटील यांनीही पोलीस ठाण्यामध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आपल्या कार्यकर्त्यांबरोबरही त्यांनी हितगुज केली.
माझी बदनामी करण्यासाठी षडयंत्र : रोहित पाटील
दरम्यान, याबाबत रोहित पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, तासगाव येथील पैसे वाटपाशी माझा काहीही संबंध नाही. जी दोन लोकं पैसे वाटप करताना सापडले आहेत ते पूर्वी आमचे कार्यकर्ते होते, हे खरे आहे. मात्र बऱ्याच काळापासून त्यांचा आणि आमचा संबंध नाही. विरोधकांनी मला बदनाम करण्याच्या हेतूने विनाकारण या प्रकरणामध्ये गोवले आहे. स्व. आर. आर. पाटील यांनाही विरोधकांनी अशाच प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मी मागणी केली आहे.