जत : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जत विधानसभेसाठी तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. या तिरंगी लढतीमुळे तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे. जत विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले, ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जतमध्ये भाजपचे तम्मणगौडा रविपाटील यांनी महायुतीतून बंडखोरी केली आहे.तीन प्रमुख उमेदवारांसह ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उत्तरले आहेत.प्रामुख्याने विधानसभेचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे बंडखोर तम्मणगौडा रविपाटील यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.अर्ज माघारीच्या सोमवारी शेवटच्या दिवशी प्रकाश विठोबा जमदाडे,शंकर रामू वगरे,सुरेश बाबूराव शिंदे
विजय अंबुराया बागेळी,श्रीशैल सातलिंग उमराणी,संजय दऱ्याप्पा कांबळे या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.१७ उमेदवारांनी २१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जत विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व महायुतीतून इच्छुक असलेल्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
भाजपच्या भूमिकेवर नाराज असलेले तम्मणगौडा रविपाटील यांनी कोणत्याही दबावाला, आमिषाला, नेत्यांच्या मध्यस्थीला बळी न पडता माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणारच असल्याचा पवित्रा कायम ठेवल्याने तम्मणगौडा रविपाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने जतमध्ये तिरंगी लढत रंगणार हे स्पष्ट होते. तम्मणगौडा रविपाटील निवडणूक लढविण्यावर ठाम राहिल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रमुख प्रकाश जमदाडे, सुरेश शिंदे, संजय कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. एकूनच जतमधील तिरंगी लढत ही डावपेचांमुळे रंगदार होणार हे निश्चित. अपक्ष उमेदवार किती मते घेतात यावर विजयाचे गणित जुळणार हे मात्र नक्की.
निवडणूक रिंगणातील ११ उमेदवार
जत विधानसभेसाठी महाविकास आघाडीतून आ. विक्रमसिह सावंत, महायुतीतून आ. गोपीचंद पडळकर, बसपातून विक्रम होणे, हिंदुस्थान जनता पार्टीतून सतीश कदम तर, बंडाचा झेंडा हाती घेत भाजपमधून इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रविपाटील, रिपाई आठवले गटाचे महादेव हुचगोड, महादेव पवार, भिमगीडा बिराजदार, दत्तात्रय भुसनूर, अण्णासगी टेंगले, लक्ष्मण पुजारी हे निवडणूक रिंगणात उत्तरले आहेत.