कवठेमहांकाळ मतदारसंघात अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १६ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर. आर. पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय रामचंद्र पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संभाजी यशवंत पाटील, दिगंबर रामचंद्र कांबळे, अर्जुन बबन थोरात, प्रकाश तुकाराम शिंगाडे, अनिल बिरू गावडे, संभाजी दत्तात्रय माळी, सचिन मनोहर वाघमारे, घागरे युवराज चंद्रकांत, सूरज दत्तात्रय पाटील, संजय गोविंदराव चव्हाण, प्रदीप बाळकृष्ण माने, प्रशांत लक्ष्मण सदामते, नदीम नजरुद्दीन तांबोळी, प्रमोद धोंडिराम देवकते, शिवाजी हरिश्चंद्र ओलेकर आणि संजय कृष्णा चव्हाण या १६ जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
अर्ज माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, १७ उमेदवार तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेच्या रिंगणात आहेत. यामध्ये रोहित सुमन आर. आर. आबा पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), वैभव गणेश कुलकर्णी (मनसे), डॉ. शंकर माने (बसप), संजय पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) या मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
याशिवाय दत्तात्रय बंडू आठवले (वंचित बहुजन आघाडी), डॉ. शशिकांत दुर्योधन कोळेकर (जनहित लोकशाही पार्टी), कृष्णदेव पांडुरंग बाबर (अपक्ष), दत्तात्रय भीमराव बामणे (अपक्ष), महादेव भीमराव दोडमणी (अपक्ष), नानासोो आनंदराव शिंदे (अपक्ष), रोहित आर. पाटील (अपक्ष), रोहित आर. पाटील (अपक्ष), रोहित आर. आर. पाटील (अपक्ष), विक्रांतसिंह माणिकराव पाटील (अपक्ष), विजय श्रीरंग यादव (अपक्ष) विराज संजय पानसे (अपक्ष) व सुनील बाबुराव लोहार (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.