विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील व महायुतीचे निशिकांत पाटील यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. येथे प्रमुख पक्षाच्या कोणीही बंडखोरी केलेली नाही. त्यामुळे एकास एक लढत करण्यात महायुतीला यश आले आहे. अर्ज दाखल केलेल्या २१ उमेदवारांपैकी ९ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, शिवसेना शिंदे गटाचे सागर मलगुंडे, मराठा क्रांती मोर्चाचे बी. जी. पाटील, दिग्विजय पाटील, हणमंत पाटील, अपक्ष विनायक शेवाळे, चंद्रशेखर तांदळे, जगन्नाथ मोरे, दत्तात्रय गावडे यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जयंत राजाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), निशिकांत प्रकाश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), राजेश शिवाजी गायगवळे (वंचित बहुजन आघाडी), सतीश शिवाजी इदाते (राष्ट्रीय समाज पक्ष), अमोल विलास कांबळे (बहुजन समाज पार्टी), अमोल आनंदराव पाटील (अपक्ष), किरण संपतराव पाटील (अपक्ष), जयंत रामचंद्र पाटील (अपक्ष), जयंत राजाराम पाटील (अपक्ष), निशिकांत दिलीप पाटील (अपक्ष), निशिकांत प्रल्हाद पाटील (अपक्ष), गुणवंत रामचंद्र देशमुख (अपक्ष) हे १२ उमेदवार
निवडणूक रिंगणात राहिले आहेत. १२ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत जयंत पाटील व निशिकांत पाटील यांच्यातच होणार आहे. यावेळी एकास एक लढत करण्यात महायुतीला यश आले आहे. त्यामुळे येथील लढत लक्षवेधी होईल.
या जागेसाठी भाजप व शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच होती. शेवटपर्यंत ही जागा कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता कायम होती. शेवटच्या टप्प्यात ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेली. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळविली. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले आनंदराव पवार व गौरव नायकवडी यांना थांबावे लागले.
नावात साम्य असलेले सहा उमेदवार
महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील व महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील या दोघांच्या नावाशी साम्य असलेले अन्य २-२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विरोधी उमेदवारांची मते कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून हा डाव खेळला गेल्याची चर्चा आहे.