विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मुचंडीतील तपासणी नाक्यावर एका टेम्पोमधून बंदी असलेला ४७ हजारांचा गुटखा व पान मसाला पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री केली. यात टेम्पो, गुटखा व पान मसाला असा ८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सिद्राम विठ्ठल कोगनूर (वय २१, रा. झळकी, ता. आळद, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने बसर्गी व मुचंडी येथे चेकपोस्ट उभारून नाकाबंदी सुरू केली आहे. एका टेम्पोतून गुटख्याची जतकडे अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल विनोद सकटे यांना मिळाली होती.
त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव व गुन्हे प्रकटीकरण विभागातील नितीन पाटील, सागर कारंडे यांनी टेम्पोचालक सिद्राम कोगनूर यास अडवले व गाडीतून सुमारे ५० हजारांचा पान मसाला व गुटखा जप्त केला.