जत तालुक्यासह राज्यभरातील शेतमजूर मोठ्या संख्येने परजिल्ह्यात ऊसतोडणीसाठी रवाना होत आहेत. यामुळे परिसरातील लहान गावांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. बाजारपेठेवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.यंदा साधारण पंधरा दिवस अगोदर टोळ्या रवाना होत आहे.मागील वर्षी दिवाळीत टोळ्या रवाना झाल्या होत्या.गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुकादम आपापल्या मजुरांना परजिल्ह्यात ऊसतोडणीसाठी मजूरांना पाठवत आहेत
प्रत्येक गावातून ऊसतोडणी मजूर टँक्टर,ट्रकमधून बिऱ्हाड घेऊन बायका,मुले,जनावरे घेऊन निघाल्याचे चित्र तालुक्यातील रस्त्यावर दररोज दिसत आहे.दरम्यान, स्थलांतरामुळे मजुरांचे मतदान होऊ शकणार नाही, याचा फटका तेथील उमेदवारांना बसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ७० हजारहून अधिक ऊसतोड मजूर विदर्भ, मराठवाडा आणि विजापूर जिल्ह्यांतून येतात. प्रामुख्याने बीड, परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतून मजूर येतात.
दिवाळी संपताच त्यांचा प्रवास कारखान्यांकडे सुरू होतो. मार्चमध्ये हंगाम संपताच परततात. सध्या महाराष्ट्रभरात निवडणुका सुरू आहे.त्याचा फटका तेथील उमेदवारांना बसणार आहे.
कर्नाटकातील साखर कारखाने सुरू होत असल्याने मुकादम मजूर घेऊन जात आहेत. प्रत्येक मुकादमाकडे 15 ते 25 मजूर (कोयते) असतात. मजुरांना पाच-सहा महिने रोजगार मिळत असल्याने मजुरांचा ऊसतोडणीसाठी जाण्याकडे ओढा असतो. पाच-सहा महिन्यात खर्च वजा जाता 1 लाख ते दीड लाखापर्यत मजूरी कमावत असल्याचे एका मजुराने सांगितले.
मजुरांसाठी त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते. औषधोपचाराचा खर्च कारखान्यांकडून मोफत केला जातो. ऊसतोडणी वेळी हिरवा चारा असतो, तो चारा विक्री करून मजूर आपला घरखर्च भागवितात.
जेवढी ऊसतोड झाली त्याप्रमाणे मुकादमाकडून ऊसतोड कामगारांना रक्कम वाटप केली जाते. मुकादम आणलेल्या मजुरांची देखरेख ठेवण्याचे काम करतो. तसेच कारखान्याच्या नियोजना प्रमाणे ऊसतोड केली जाते. दरम्यान, ऊसतोडणी साठी मजूर मोठ्या प्रमाणात कोल्हापूर,सातारा,सोलापुर,उस्मानाबांद,व लगतच्या कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यात स्थलांतरित होत असल्याने शेतकर्यांना या काळात मजुरांची टंचाई जाणवते. शेतकर्यांना वेळेवर काम करून घेण्यासाठी इतर मजुरांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. तसेच मोठय़ा प्रमाणावर मजूर स्थलांतरित होत असल्याने बाजारपेठेवरही त्याचा प्रतिकूल परिणाम पाहावयास मिळतो.
दरम्यान, एका मजुराला दरवर्षी परजिल्ह्यात ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होण्यामागील कारण विचारले असता, त्याने सांगितले की, शेतीची सर्व कामे व पेरणीही ट्रॅक्टरद्वारे होऊ लागल्याने हाताला थोडेच दिवस काम असते. त्यात पैसाही हवा तसा मिळत नाही. ऊसतोडणीत 5 ते 6 महिने सलग काम असते व पैसाही जास्त मिळतो. म्हणूनच मजूर तिकडे जातात.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. हजारो मजुरांची वाहने, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या रस्त्यावर दिसू लागली आहेत. कारखाना परिसरात त्यांच्या झोपड्या उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे साखर कारखानदार निवांत झाले असले, तरी राजकीय पक्षांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील मतदानाकडे पाठ फिरवून मजुरांचे तांडे पश्चिम महाराष्ट्रात येऊ लागले आहेत.
कर्नाटकातील कारखाने सुरू,महाराष्ट्रातील ऊसतोडसाखर आयुक्तांनी महाराष्ट्रातील कारखान्यांना १५ नोव्हेंबरनंतर गाळपाची परवानगी दिली आहे. यादरम्यान, कर्नाटकातील कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील उसाची उचल सुरू केली आहे. याची चिंता सांगली, कोल्हापुरातील कारखान्यांना लागली आहे. लवकर गाळपाची परवानगी देण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. १५ नोव्हेंबररोजी गाळप होणार असल्याने १० नोव्हेंबरपासून मोठ्या संख्येने मजूर दाखल होणार आहेत.
मतदानापुरते गावाकडे
ऊसतोड मजुराची हजारो मते बुडू नयेत, यासाठी मतदानापुरते त्यांना गावाकडे नेण्याचा खटाटोप उमेदवारांना करावा लागतो. २०२२ मधील मराठवाड्यातील ग्रामपंचायत निवडणुकांवेळीही शेकडो मजुरांना मतदानासाठी नेऊन पुन्हा परत कारखान्यांवर आणून सोडले होते. यावेळीही त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून खास वाहनांतून ने- आण करावी लागणार आहे. या दोन दिवसांपुरती जिल्ह्यातील ऊसतोड थंडावणार आहे.