ज्येष्ठ नागरिकांनी होम वोटिंग सुविधेबद्दल निवडणूक यंत्रणेचे मानले आभार

0
5

सांगली : भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षे व 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी  जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा अशा नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून देत आहे. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी मा. भारत निवडणूक आयोगाचे व निवडणूक यंत्रणेचे आभार मानले आहेत.

            

वाहतूक शाखा सांगलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मातोश्री मंगला वसंतराव कुलकर्णी (वय वर्षे 91) यांनी होम वोटिंग सुविधेव्दारे मतदान केले. वृध्द अवस्थेमध्ये मतदान केंद्रावर जाता येत नसल्यामुळे त्यांनी होम वोटिंगचा पर्याय निवडला. निवडणूक यंत्रणेने घरी येवून वोटिंग घेतल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आभार मानले.

            

नेमिनाथनगर सांगली येथील ज्येष्ठ नागरिक विद्या करमरकर (वय वर्षे 86) यांनी होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. भारत निवडणूक आयोगाचे व निवडणूक यंत्रणेचे आभार मानले आहेत. याबद्दल त्या म्हणाल्या शारिरिक व्याधीमुळे मतदान केंद्रावर जाता येत नव्हते. याबद्दल त्यांनी यंत्रणेस थेट आभारपत्रच दिले आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराचे मत अत्यंत बहुमोल असते. या तत्वाची निवडणूक यंत्रणेने अंमलबजावणी करून होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे मला घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता आला. यासाठी त्यांनी 282-सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे  व त्यांच्या तत्पर टीममुळे घडल्याचे पत्रात नमूद केले आहे.

            

मतदारयादीमध्ये 85 वर्षे व 85 वर्षावरील मतदार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी दिनांक 22 ते 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत बीएलओंनी संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देवून त्यांना होम वोटिंग सुविधेचा लाभ घेण्याबाबत अथवा मतदान केंद्रावर येवून मतदान करण्याबाबत विचारणा केली.  ज्या ज्येष्ठ नागरिकांनी होम वोटिंग सुविधेसाठी नोंदणी केली त्यांच्या घरी जावून त्यांचे होम वोटिंग निवडणूक यंत्रणेव्दारे जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघात घेण्यात येत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here