डफळापूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल डफळापूर येथे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम सावंत यांच्या प्रचारार्थ एक कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सावंत यांनी गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताचा सन्मान करत उपस्थितांना संबोधित केले.
विक्रम सावंत यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी पक्षावर टीका करत गावकऱ्यांचे लक्ष विकासकामांवर केंद्रित केले.मी येथे जात आणि धर्माच्या मुद्यावर मतं मागण्यासाठी नाही, तर आतापर्यंत केलेल्या विकासकामांच्या बळावर मत मागण्यासाठी आलोय,असे सावंत म्हणाले.सत्ताधारी पक्षाने या पाच वर्षात जाती-धर्मामध्ये दुही निर्माण करण्याचे काम केले आहे, पण काँग्रेस आणि महाविकास आघाडी सर्व धर्म, जात आणि घटकांना एकत्र घेऊन संविधानाच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे.
ते पुढे म्हणाले की, जत तालुक्यातील शाळांचे सुशोभीकरण, शिक्षण, शेती, पाणी, रस्ते, ऊसतोड कामगार व सहकार क्षेत्रातील विकासकामे यावर विशेष लक्ष दिले गेले आहे. जत तालुका नंदनवन बनवण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगून सावंत यांनी गावकऱ्यांना आगामी निवडणुकीत “हाताचा पंजा” चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले.
या सभेला काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.