साताऱ्यातील एका सभागृहात नुकताच एक मेळावा पार पडला. मेळाव्याला आलेल्या प्रमुख नेतेमंडळींचे भलेमोठे पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या मेळाव्याला दोन तरुणही आले होते. मेळावा सुरू असताना एका तरुणाला सतत फोन येत होता. ‘दहा मिनिटांत आलो…. पाच मिनिटांत आलो… असं म्हणून तो फोन ठेवत होता. मेळावा संपताच एकजण म्हणाला, ‘चल आपल्याला आणखी एका कार्यक्रमाला जायचंय. यापेक्षा तो कार्यक्रम जास्त महत्त्वाचा आहे.
त्यावर दुसरा तरुण म्हणाला, मोकळ्या हातानंच होय.’ त्यावर तो मित्र काहीही न बोलता गर्दीतून वाट काढत थेट व्यासपीठावर गेला. तेथे ठेवलेल्या पुष्पगुच्छमधील सर्वात मोठा आणि सुंदर पुष्पगुच्छ तो घेऊन आला. तो गुच्छ पाहून दुसऱ्या मित्राच्या चेहऱ्यावर प्रकटलेल्या भावना सर्व काही सांगून गेल्या. भावा, तुला शंभर तोफांची सलामी द्यायला हवी, असं म्हणत दोघेही गर्दीतून बाहेर पडले.