विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान जिल्ह्यात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १३ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला. सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारीवर १०० मिनिटांच्या आत कार्यवाही करण्याचा अवधी आहे.
मात्र जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तक्रार सरासरी २४ मिनिटातच निकाली काढण्यात आल्याची माहिती नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांनी दिली.
या तक्रारींमध्ये मद्य वितरणाच्या २, परवानगीशिवाय पोस्टर्स / बॅनर लावणे ३, धार्मिक किंवा सांप्रदायिक भाषणे / संदेश २ व अन्य ६ अशा एकूण १३ तक्रारींचा समावेश होता.
सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
आचारसंहिता कक्षाकडे १४ तक्रारी प्राप्त
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष २४x७ सुरू आहे. या कक्षाकडे आतापर्यंत १४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी १३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
मतदार हेल्पलाईनवरील सर्व तक्रारींचा निपटारा
मतदार हेल्पलाईन क्र. १९५० वर आतापर्यंत एकूण २९२ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या. यामध्ये मतदारासंबंधी २८९ व आचारसंहिता संबंधी ३ अशा एकूण २९२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, अशी माहितीही श्री. सुरवसे यांनी दिली.