आठ मतदारसंघांत ७,५२७ सैनिक; मतदान केवळ २०० मतदान

0
274

सैनिक मतदार मतदानापासून वंचित राहत नाहीत. ते घर, गावापासून दूर कार्यरत असले तरी त्यांना टपाली मतपत्रिकेच्या साहाय्याने मतदान करता येते. जिल्ह्यात एकूण सात हजार ५२७ सैनिक मतदार इटीपीबीएमएस प्रणालीद्वारे मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवणार आहेत; पण मतमोजणीला तीन दिवस शिल्लक राहिले असताना केवळ २०७ सैनिकांच्या मतपत्रिका मिळाल्या आहेत.

मतदान करण्यासाठी सेनादलातील मतदारांना मतदार म्हणून नोंदणी करावी लागते. सेनादलातील आसाम रायफल्स, सीआरपीएफ, बीएसएफ, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सीआयएसएफ आदी विभागांतील जवान मतदार नोंदणीचा विहित नमुना अर्ज दोन भरून नोंदणी करतात. निवडणूक आयोगाने यासाठी सर्व्हिस व्होटर पोर्टल विकसित केले असून देशाच्या कोणत्याही भागात कर्तव्यावर असलेले सैनिक त्यांच्या रेकॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून मतदार नोंदणीचा अर्ज त्यांचे मूळ गाव ज्या मतदारसंघात आहे, त्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन पाठवितात.

सैनिक मतदारांकडून प्राप्त झालेले अर्ज तपासून मतदार नोंदणी अधिकारी अर्ज स्वीकृत करून घेतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा शेवटचा मतदार यादी भाग सेना दलातील मतदारांसाठी असतो. मतदार नोंदणी अधिकारी सेना दलातील मतदाराचे नाव समाविष्ट करून घेतात. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सर्व्हिस व्होटर पोर्टलच्या माध्यमातून होत असते. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील सात हजार ५२७ सैनिक सीमेवर कर्तव्य बजावत आहेत.

त्यांना ५ नोव्हेंबर २०२४ रोजी मतपत्रिका निवडणूक आयोगाच्या सर्व्हिस व्होटर पोर्टलचे माध्यमातून ऑनलाइन पाठविले आहेत. यापैकी १८ नोव्हेंबरपर्यंत केवळ २०७ मतदारांच्याच मतपत्रिका मिळाल्या आहेत. मतमोजणी दि. २३ रोजी असून सकाळी ८ वाजेपर्यंत मतपत्रिका स्वीकारणार आहेत.

सैनिक मतदानाचा हक्क बजावतात? 

सेना दलातील मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी त्यांना आयोगाने विकसित केलेल्या डटीपीबीएमएस प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्यात येते. या प्रणालीमुळे देशाच्या कोणत्याही भागात कार्यरत असलेल्या सैनिकांपर्यंत मतपत्रिका क्षणार्धात पोहोचते. सैनिक मतदार आपल्या लॉगइनद्वारे मतपत्रिकेची प्रिंट घेऊन त्यांच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये तयार केलेल्या मतदान कक्षात मतदान करतात. मतदान झाल्यावर पाकिटातून पोस्टाद्वारे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतपत्रिका पाठवतात. या पोस्टेजचा खर्च आयोगाकडून करण्यात येतो, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांनी दिली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here