सांगली : बनावट व्यक्ती उभी करून तारण गहाण दस्ताद्वारे सात लाखांचे कर्ज काढून फसवणूक केल्याबद्दल मिरज येथील तिघांना दोन वर्षे साधी कैद व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एन. शेट्टी यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील इमरान मुजावर यांनी काम पाहिले.
राहुल मनमत ऊर्फ मोहन मोरे (वय ४४), पद्मावती मनमत ऊर्फ मोहन मोरे (५२) व सविता नितीन मोरे (४६, सर्व रा. पंढरपूर रोड, मिरज) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने या तिघांना भा.दं.वि. कलम ४६७, ४६८, ४७१, ४१९, ४२० व ३४ अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
खटल्याची पार्श्वभूमी अशी : पद्मावती मोरे व स्वाती देशमुख यांची पंढरपूर रोड, मिरज येथे जागा आहे. सात-बारावर या दोघींची सामायिक नावे आहेत. पद्मावती मोरे यांनी विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्थेकडून ही जागा तारण ठेवून ७ लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी या जागेचा तारण गहाण दस्त केला होता. त्या दस्तासाठी सविता मोरे यांना जागा मालक स्वाती देशमुख म्हणून दस्त नोंदणी कार्यालयात उभे केले होते. तसा दस्त नोंदविला होता.
आपली फसवणूक करून जागा तारण दिल्याची माहिती स्वाती देशमुख यांना मिळताच त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. हवालदार एच. एम. कोळी यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने शिक्षा सुनावली.