विक्रमसिंह सावंत : पराभवाबद्दल खंत; ईव्हीएमबद्दल शंका
जत : संपूर्ण महाराष्ट्रात लागलेले विधानसभेचे निकाल धक्कादायक व संशयास्पद आहेत. महायुतीने केंद्रातील सत्तेचा गैरवापर केला असून हा निकाल सर्वसामान्यांसह आम्हालाही मान्य नाही. या निवडणुकीत महायुतीने लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम केल्याचा घणाघाती आरोप करत जतचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी या निकालाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासो कोडग, आव्यारावा बिरादार, अशोक बननेवर, बसवराज बिरादार, बाबासाहेब माळी, महादेव कोळी, निलेश बामणे, मुन्ना पखाली, आकाश बनसोडे, सलीम पाच्छापुरे उपस्थित होते. विक्रमसिंह सावंत म्हणाले, महायुतीच्या विजयी उमेदवारांचा निकाल पाहिला तर, त्यांना पडलेली मते व मिळालेले मताधिक्य हे समान आहे.
महायुतीच्या उमेदवारांना लाखाच्यावर मते तर, ३६ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. हे सारे संशयास्पद आहे. जतसह राज्यातील ९५ मतदारसंघात ईव्हीएममुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला तर, माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम यांचे जे मताधिक्य घटले आहे ते अशक्यप्राय आहे.
मतमोजणी दिवशी सकाळी अकरापर्यंत महायुती व महाविकास आघाडीत चुरस दिसली पण त्यानंतर सर्व निकाल एकतर्फी लागण्यास सुरुवात झाली. राज्यातील जनतेने हा निकाल अमान्य केला आहे, इतकेच नव्हे तर, माजी निवडणूक आयुक्तांनीही निकालाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. या निकालाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहोत.
आपला विजय निश्चित होता पण ईव्हीएम मशिनमधील घोळामुळे पराभव झाल्याचे सांगून सावंत म्हणाले, पाच वर्षे आमदार म्हणून काम करताना जतच्या पाण्यासह अनेक प्रश्न मार्गी लावले. विकासनिधी खेचून आणला. जतकरांच्या सुखदुःखात सहभागी झालो. जतच्या पाण्यासाठी आंदोलने केली. जतकरांची कामे केल्याने आपला पराभव होणे शक्य नाही. जत शहरासह तालुक्यातील ६७ गावात मताधिक्य १०० टक्के मिळणे अपेक्षित असताना अवघ्या सहा गावात किरकोळ मताधिक्य मिळाले. हा जनतेचा कौल नसल्याचे सावंत यांनी सांगत निकाल अमान्य असल्याचे सांगितले.
पराभवाची खंत
विक्रमसिह सावंत यांनी पराभवाबद्दल जनतेला नव्हे तर ईव्हीएम मशीनला दोषी धरले. प्रामाणिकपणे कामे करुनही ३८ हजाराहून अधिक मतांनी जो पराभव झाला तो मान्य नाही, मी निष्क्रिय आमदार होतो का? असा सवाल उपस्थित करत पराभवाची खंत माजी आमदार विक्रमसिह सावंत यांनी व्यक्त केली.