जत : महाराष्ट्र व कर्नाटकमधील भक्तांचे आराध्य दैवत गुहापूर येथील दानम्मा देवीची यात्रा दि. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत भरणार आहे. यात्रा कार्तिक महिन्यातील अमावास्येच्या दिवशी असते. सलग चार दिवस यात्रेचे नियोजन श्री दानम्मादेवी ट्रस्टतर्फे केले आहे. ट्रस्टकडून भाविकांसाठी सुविधा दिल्या आहेत.
श्री दानम्मा देवीच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पदयात्रेनेही दाखल होतात. दि. २९ नोव्हेंबर रोजी अनक्षेत्र (दासोह) पूजेचा कार्यक्रम सकाळी १० वाजता गुरूदेव शिवाचार्य हिरेमठ (गुड्डापूर) आणि डॉ. जयदेश्वर शिवाचार्य महास्वामी संस्थान हिरेमठ (गौडगाव) यांच्या हस्ते होणार आहे.
शनिवार, दि. ३० रोजी कार्तिक अमावास्येनिमित्त रात्री ८ वाजता सर्व भक्तांच्या उपस्थितीत कार्तिक दीपोत्सव होणार आहे. त्यानंतर श्री देवीचा पालखी उत्सव गुरुपाद शिवाचार्य (श्रीमठ, गुड्डापूर) व अभिनव संगणबसव शिवाचार्य (महास्वामी संस्थान, हिरेमठ महास्वामी ज्ञान योगाश्रम (विजयपूर) यांच्या हस्ते होणार आहे. रविवार, दि. १ रोजी सायंकाळी ५ वाजता भक्तांच्या उपस्थितीत श्री देवीचा रथोत्सव गुरुपाद शिवाचार्य महास्वामी व योगेश्वरी माताजी (सिद्धारूढ मठ, बुऱ्हाणपूर) यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यात्रेत भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व स्नानासाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सोयही करण्यात आली आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नाही, यासाठी ट्रस्टकडून सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. रथोत्सवासाठी आमदार विजयकुमार देशमुख (सोलापूर), आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत.
श्री दानम्मा देवी ट्रस्टचे अध्यक्ष विजूगौड पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, सचिव विठ्ठल पुजारी, सर्व विश्वस्त, ट्रस्टचे व्यवस्थापक राहुल कुलबुर्गी, मुख्य लिपिक इराण्णा जेऊर व सर्व श्री दानम्मा देवीचे पुजारी यांनी नियोजन केले आहे.