मोलकरीण म्हणून घरात प्रवेश करून पहिल्याच एक, दोन दिवसात घर लुटणाऱ्या सराईत महिलेला मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत तिने वाशीतदेखील अशा प्रकारे गुन्हा केल्याचे समोर येताच तिला वाशी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तिच्या चौकशीत ४४ गुन्हे समोर आले असून पाच गुन्ह्यांत पोलिस तिच्या शोधात होते.
वाशी सेक्टर १९ येथे राहणाऱ्या झाकीर म्हाते (५९) यांच्या घरी चोरी झाल्याची घटना २६ नोव्हेंबरला घडली होती. त्यांच्याकडे नुकत्याच कामावर ठेवलेल्या मोलकरणीने घरातील सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लुटला होता.
परंतु, तिच्याबद्दल जास्त काही माहिती नसल्याने वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिस तिचा शोध घेत होते. याचदरम्यान मुंबईतदेखील अशाच प्रकारे मोलकरणीने चोरी केल्याचा गुन्हा घडला होता. त्याद्वारे मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासातून माहुलगाव परिसरातून आशा शैलेश गायकवाड (३८) या महिलेला अटक केली.
अधिक चौकशीत ती सराईत गुन्हेगार असून तिच्यावर ४४ हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. त्याशिवाय वाशीसह जुहू, वर्सोवा व बांद्रा येथे नुकतेच केलेल्या पाच गुन्ह्यात पोलिस तिच्या शोधात होते. त्यानुसार आशा हिला अटल करून वाशी पोलिसांच्या ताब्यात दिले.