जत : विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेलो नाही, तुम्हीही खचू नका. २० हजार लोकांनी आपल्याला पसंती दिली हीच तुमची आणि माझी कमाई आहे.
‘पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या दमाने उभे राहात आपापल्या गावात सक्रिय व्हा. सक्षम विरोधक म्हणून जत तालुक्यात भूमिका पार पाडताना संघटना मजबूत करून नव्या दमाने वाटचाल करा, जत तालुक्यात आपली ताकद कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी’.
माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, संघर्ष केला त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. स्वाभिमानी विचारांची लढाई आपण ताकदीने लढलो. त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात उतरलोय. तुम्हीही कामाला लागा, पुन्हा लढणार आणि जिंकणार,असा आशावाद स्वाभिमानी विकास आघाडीचे पराभूत उमेदवार तम्मणगौडा रविपाटील यांनी चिंतन बैठकीत व्यक्त केला.
जत विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार तम्मणगौडा रविपाटील यांचा पराभव झाला.त्यानंतर शनिवारी त्यांनी जाड्रबोबलाद येथील सभागृहात कार्यकर्त्यांचा चिंतन बैठक घेतला. रविपाटील म्हणाले, काही दिवसात या मतदार संघात जबरदस्त वातावरण तयार केले. अनेक अडचणी होत्या. त्यात मी नवखा होतो. समोर सत्ता, संपत्ती आणि हजारो कोटींच्या कामांचा दावा, त्यामुळे सत्ता संपत्तीविरोधात सामान्य जनता अशी ही लढाई होती. कार्यकर्ते निकराने लढल्याने विरोधकांना घाम फुटला होता. कुठे काय चुकले, कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन आपण करू; पण ज्याप्रमाणे तुम्ही जीवाचे रान केलेत आणि अभूतपूर्व लढा दिलात त्याबद्दल ऋणी आहे.
लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.त्यासाठी आजपासूनच कामाला लागा. पक्षिय पातळीवर जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण सर्व मिळून घेऊ ; पण येथे आपण एकत्र येऊन लढायचे आहे. मी तुमच्यापाठी ठाम उभा आहे. आता आलेले अपयश हे पुढील विजयाचे संकेत आहेत. आगामी काळात काहीजण सत्तेच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. याची कल्पना मला पूर्वीच आली होती; पण तुमच्यासारखे कडवट कार्यकर्ते माझ्याबरोबर असल्याने चिंता करणार नाही, असेही रविपाटील यांनी सांगितले.
यावेळी शंकर वगरे सर, बसवराज पाटील, आर.बी.पाटील सर, डि.एस.कोटी, महांतेश पाटील, सुनिल पोतदार, तानाजी पाटील, हणमंत गडदे, पिरू कोळी, रामचंद्र पाटील, अशोक बिळूर, संजय शिंदे, सोनू सगरे, किरण बिज्जरगी यांच्यासह स्वाभिमानी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.