जत : जत २८८ विधानसभा मतदारसंघातून ३८ हजार मताधिक्याने निवडून आलेले आ. गोपीचंद पडळकर यांना भाजप मंत्रीपद देणार आहेच. परंतु त्यांच्या राहीलेल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी विधान परिषदेवर जत तालुक्यातील ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी यांना विधान परिषदेचे आमदार करावे, अशी मागणी भाजपा वैद्यकीय सेल, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे. आ. पडळकर यांनी जत तालुक्यामध्ये चौथ्यांदा कमळ फुलवले आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांनी २०० कोटींच्यावर निधी जत तालुक्याला दिल्याने ते निवडून आले. महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत येथील प्रचार सभेच्या वेळी दिले होते.
पडळकर यांचा राहिलेला विधानपरिषदेचा कार्यकाळ डॉ. आरळी यांना देण्यात यावा, अशी मागणी सर्वस्तरांमधून होत आहे. जत विधानसभेत आ. पडळकर यांच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजाचे भाजपचे ज्येष्ठ नेते भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना विधानपरिषद आमदार म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी होत आहे.गेली ३० वर्षे जत तालुक्यात डॉ. आरळी हे भाजपा पक्षात काम करीत आहेत.
त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. त्यामुळेच जत तालुक्यात कमळ चौथ्यांदा खुलले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव जनसंपर्क आणि पक्षासाठी तळमळीने काम करण्याची जिद्द यामुळे डॉ. आरळी यांनी मोठा जनसंपर्क तयार केला आहे. त्यामुळे डॉ. आरळी यांना विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.