आहारातील घटकांवर आरोग्य अवलंबून असते. रोजचा आहार चौरस असावा म्हणजे त्यात शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्व पदार्थांचा समावेश असावा असे आहार शास्त्र सांगते. पण धावपळीच्या सध्याच्या काळात लोकांना स्वयंपाकासाठी आणि जेवणासाठी वेळ नाही मग आधार घेतला जातो तो फास्टफुडचा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण फास्टफुड आवडीने खातात. विशेतः शाळकरी मुलांना तर फस्टफुड म्हणजे पर्वणीच वाटते. घरी तयार केलेली भाजी पोळी खाताना किरकिर करणारे मुले फास्टफुड मात्र मिटक्या मारत खातात त्यामुळेच झटपट तयार होणारे आणि जिभेला हवेहवेसे वाटणारे हे पदार्थ सध्या भरपूर खपतात.
जिभेला हवेहवेसे वाटणारे हे पदार्थ प्रकृतीला मात्र चांगले नसतात. झटपट तयार होणाऱ्या या फास्टफुडमध्ये साखर आणि मीठ यांचे प्रमाण खूप असते शिवाय ते भरपूर तळलेले देखील असतात. अतीप्रक्रिया केलेल्या या पदार्थात कोणतेही पौष्टिक घटक नसतात त्यामुळे या पदार्थांपासून दूर राहावे असा सल्ला डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ देत असतात तरी लोक त्यांचे ऐकत नाही. दोन वर्षांपूर्वी एका फास्टफुड बनवणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीने हे मान्य केले होते की ही कंपनी तयार करीत असलेल्या साठ टक्के पदार्थात आणि शितपेयांमध्ये शरीराला पौष्टिक असे काही नाही. या कंपनीचे नुडल्स आणि कॉफी हे दोन पदार्थ जगप्रसिद्ध आहेत. शिवाय चॉकलेट, केक, पास्ता, केचप, वेफर्स, कुरकुरे यासारखे विविध पदार्थ ही कंपनी बनवते. विशेष म्हणजे हे पदार्थ लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. पालकही मुलंच्या हट्टापायी हे पदार्थ मुलांना देतात. मुले हे पदार्थ मिटक्या मारत खातात. कंपनीने या पदार्थात कोणतेही पौष्टिक घटक नसल्याचे मान्य करूनही पालक फास्टफुड चा हट्ट सोडत नाही.
काही पदार्थात तर शरीरास हानिकारक घटक असतात तज्ज्ञांनी ते संशोधनाअंती सिद्ध करून दाखवले आहे. ज्या फास्टफुड पदार्थात शरीरास हानिकारक घटक असल्याचे सिद्ध झाले ते घटक कंपनीने काढून टाकल्याचे मान्य केले मात्र अजूनही असे अनेक पदार्थ आहेत की ज्यात शरीरास हानिकारक असणारे घटक आहेत व ते पदार्थ बाजारात सर्रास विकले जात आहेत. काही जगप्रसिद्ध कंपन्यांवर असे आरोप आहेत की त्यांच्या पदर्थात शरीरास हानिकारक घटक आहेत तरीही या कंपन्यांच्या फास्टफुड पदार्थांची लोकप्रियता कमी झाली नाही उलट वाढतच चालली आहे. फास्टफुडमुळे मुलांना अनेक आजरांना सामोरे जावे लागत आहे. अतिप्रमाणात फास्टफुड खाण्यात आल्यास हृदयरोग, मधुमेह आणि स्थूलतेचा धोका आहे. अतिप्रमाणात फास्टफुड खाणाऱ्यांना कर्करोगासारखा असाध्य आजारही होऊ शकतो असे जाणकार सांगतात त्यामुळे पालकांनी मुलांना फास्टफुड पासून दूर ठेवायला हवे. फास्टफुड ऐवजी दूध, पोळी, पराठे, चटणी, कडधान्यांच्या उसळी, पोहे, उपमा यासारखे पौष्टिक पदार्थ पालकांनी मुलांना खायला द्यावेत. मुलांना चविष्ट पदार्थ देण्याऐवजी पौष्टिक पदार्थ खायला देणे ही पालकांची जबाबदारी आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५