नवनोंदित बहुउद्देशिय प्राथमिक सहकारी संस्थांसाठी “सहकार से समृध्दी” कार्यक्रम

0
40

       

सांगली : प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून “सहकार से समृध्दी” अंतर्गत बहुउद्देशिय प्राथमिक सहकारी संस्था, दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या स्थापनेद्वारे सर्व ग्रामपंचायत व गावांना समाविष्ट करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकूण 10 हजार प्राथमिक सहकारी संस्था स्थापन झाल्या असून त्यापैकी 6 हजार या दुग्ध व्यवसायाशी निगडीत आहे. अशी महत्वपूर्ण उपलब्धी साजरी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये “सहकार से समृध्दी” अंतर्गत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या बहुउद्देशिय प्राथमिक सहकारी संस्थांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

           

जिल्हास्तरावर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सांगली च्या सभागृहामध्ये जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक‍ लि. सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, संचालिका अनिता सगरे, संचालक बी. एस. पाटील, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक निलेश चौधरी,  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसिलदार अनंत कुंभार, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.टी. वाघ उपस्थित होते.

           

या कार्यक्रमामध्ये देशपातळीवर झालेल्या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. नव्याने नोंदणी झालेल्या 17 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, 19 दुग्ध संस्था व 3 मत्स्य संस्थांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्र शासनाच्या सहकारी संस्थांसाठी सुरु केलेल्या संगणकीकरण योजना, जनऔषधी योजना, सीएससी सेंटर, गोदाम योजना, पीएमकेएसके अशा नवीन योजनांची माहिती देण्यात आली. तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकच्या सभागृहामध्ये सहकारी गॅलरीची उभारणी करण्यात आली होती. या दालनामध्ये विकास कामांमध्ये सहकारी संस्थाची भूमिका दर्शवणारी भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, अग्रगण्य नेते आणि सहकारी चळवळीतील महत्वपूर्ण प्रयत्न, विविध देशपातळीवरील सहकारी संस्था तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांची माहिती प्रदर्शित करण्यात आली.

           

स्वागत व प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले. सुत्रसंचालन सहकारी संस्था, कवठेमहांकाळ चे सहाय्यक निबंधक बिपीन मोहिते यांनी केले. आभार सहकारी संस्था तासगाव च्या सहाय्यक निबंधक रंजना बारहाते यांनी मानले.

           

या कार्यक्रमासाठी सहाय्यक निबंधक, (दुग्ध) दिपा खांडेकर, सहाय्यक निबंधक अनिल कोळी, संभाजी पाटील, विलास कोळेकर, रोहित भगरे तसेच सहकार विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी व विविध सहकारी संस्थांचे सचिव व पदाधिकारी, जिल्हा सहकार समिती व संयुक्त कार्यकारी समितीचे सदस्य उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here