सांगली : राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी अंतर्गत दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी स्वामित्व योजनेच्या मालमत्ता पत्रक/ सनद वितरण ग्रामपंचायतीमध्ये पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम व स्वामित्व योजनेंतर्गत सनद वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी ११.१५ वाजता आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एस. पी. सेठिया यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सन्माननीय सांसद सदस्य, विधानसभा सदस्य व विधानपरिषद सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील स्वामित्व योजनेतील लाभार्थी यांना सनद वितरीत केले जाणार असून स्वामित्व योजनेचे महत्व याबाबत सादरीकरण केले जाणार आहे.
स्वामित्व योजना ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, जमाबंदी आयुक्तांचे कार्यालय, पुणे व भारतीय सर्व्हेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात आला आहे. या योजनेचे (१) सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरुपात अधिकार अभिलेख तयार करणे. (२) गावातील मालमत्तांचे जी.आय.एस. प्रणालीवर आधारित मालमता पत्रक तयार करणे अशी दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
स्वामित्व योजनेचे फायदे पुढील प्रमाणे – (अ) शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण झाले आहे., (ब) मिळकतींचा नकाशा तयार झाला आहे व सीमा निश्चित झाल्या आहेत. (क) मिळकत धारकांना त्यांचे मिळकतीचे नेमके क्षेत्र माहीत झाले आहे. (ड) मालकी हक्काचा अभिलेख मिळकत पत्रिका (Property Card) तयार झाली आहे. (इ) ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन झाले आहे. (ई) गावातील रस्ते शासनाच्या / ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होवून अतिक्रमण रोखणेत मदत झाली आहे. (3) मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. (ऊ) मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावली आहे. (ए) ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध झाला आहे.
स्वामित्व योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात आजअखेर एकूण ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण झाले असून, एकूण ६७ हजार २०९ इतक्या मिळकतीचे मिळकत पत्रिका व सनद नकाशा तयार झाले आहेत. आजअखेर सांगली जिल्ह्यातील २३२ गावांमधील एकूण ३८ हजार २२८ सनदा वाटप झालेल्या आहेत व स्वामित्व योजने अंतर्गत जवळपास ६८ मिळकत धारकांना बँकेकडून विविध विकासकामासाठी कर्ज प्राप्त झाले आहे.
राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्व्हेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व (Swamitva) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक (Proparty Cards) उपलब्ध करून देताना संबधित मिळकत धारकाला दस्तऐवजाचा हक्क (Record pf rights) प्रदान करत आहेत. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकी बाबत मालमत्ता विषयक कागदपत्रे उपलब्ध झाल्याने ग्रामीण क्षेत्रातील लोकांना सक्षम बनविले आहे. एक भाग म्हणून दि. 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी १२.३० वाजता मा. प्रधानमंत्री ५० लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करताना लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या निमित्ताने सांगली जिल्हास्तरावर ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 27 डिसेंबर 2024 रोजी स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे करण्यात आले आहे.
तसेच ग्रामपंचायत स्तरावर किमान ५० सहभागी लोकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये कडेगांव तालुकामधील शिवाजीनगर (न्हावी), बेलवडे, कोतवडे, शिराळा तालुक्यामधील किनरेवाडी, खिरवडे, भाट शिरगावं व जत तालुकामधील डोर्ली अशा एकूण ०७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. या ०७ गावांमधील एकूण १ हजार ३४२ लाभार्थ्याना सनद वाटप करण्यात येणार आहे.
तसेच तासगांव, कवठेमहांकाळ, वाळवा, खानापूर, आटपाडी या तालुक्यामधील जवळपास १०० गावांमध्ये सनदा वितरीत करण्यात येणार आहेत. तरी संबंधीत गावातील ग्रामस्थांनी दिनांक २७ डिसेंबर रोजी आपल्या मिळकतीचा नकाशा/सनद प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन भूमि अभिलेख विभागामार्फत करण्यात आले आहे.