सांगली : गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त करण्यात आलेल्या जिरा, मोहरी, खसखस, धने, मिरे व सरकी पेंड या मालाचा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कोल्हापूर विभागातील जयसिंगपूर व इचलकरंजी वखार केंद्र येथे दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता लिलाव होणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती, मालाची किंमत याबाबत माहिती दिनांक 2 जानेवारी 2025 पर्यंत पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय, सांगली येथे दिली जाईल, असे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी एस. जी. पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
इस्लामपूर पोलीस ठाणे गु.र.नं. 148/2024 भादंविसं कलम 420, 406, 409, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कोल्हापूर विभागातील जयसिंगपूर वखार केंद्र व इचलकरंजी वखार केंद्र येथून मसाल्याचे पदार्थ जिरा, खसखस, धने, मोहरी, मिरे व सरकी पेंड माल तपासादरम्यान जप्त केलेला आहे. मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, 5 वे न्यायालय इस्लामपूर यांच्या दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजीच्या आदेशान्वये सदरचा मुद्देमाल हा सार्वजनिक लिलावाव्दारे विक्री करून येणारी रक्कम मा. न्यायालयामध्ये जमा करण्याबाबत आदेश झालेले आहेत.
तरी जप्त मुद्देमालाचा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कोल्हापूर विभागातील जयसिंगपूर व इचलकरंजी वखार केंद्र येथे जिरा, मोहरी, खसखस, धने, मिरे व सरकी पेंड हा मुद्देमाल जसा आहे त्या स्थितीत मिळून आलेला हा त्याच ठिकाणी साठवणुकीस आहे. हा माल मा. न्यायालयाच्या आदेशान्वये विक्री करण्याचा आहे. माल हा पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा सांगली यांच्या पूर्वपरवानगीने कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.