‘
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभर दुखवटा पाळण्यात येत आहे. देशभरातील सर्व प्रकारचे सरकारी व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तासगाव येथे आजपासून सुरू होणारा 'तासगाव महोत्सव' हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
तासगाव नगरपालिकेच्यावतीने गेल्या चार वर्षापासून 'तासगाव महोत्सव' आयोजित केला जातो. या महोत्सवात विविध व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, मुलाखत असे विविध कार्यक्रम घेतले जातात. गेल्या चार वर्षापासून अखंडपणे हा कार्यक्रम सुरू आहे.
तासगावचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यावर्षीही आजपासून 'तासगाव महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे.
या महोत्सवात सिने अभिनेते प्रवीण तरडे यांची आज मुलाखत होणार होती. तर उद्या भाऊ कदम यांचे 'सिरीयल किलर' हे नाटक होणार होते. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी 'मेरी आवाज सुनो' हा हिंदी - मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार होता. तर समारोपाच्या चौथ्या दिवशी 'जगण्यातील आनंदाच्या वाटा' हा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार होता.
तासगाव नगरपालिकेकडून 'तासगाव महोत्सवा'ची अतिशय दिमाखदारपणे तयारी करण्यात आली होती. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्यामुळे गेल्या चार वर्षांपासून तासगावकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत होती. पृथ्वीराज पाटील यांनी तासगावचा पदभार स्वीकारण्यापूर्वी तासगावचे नाट्यगृह धुळखात पडले होते. अनेक तांत्रिक अडचणी होत्या. या अडचणी दूर करून, मुख्याधिकारी पाटील यांनी नाट्यगृहाचे रोपडे पालटले.
या नाट्यगृहात आता अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यातून नगरपालिकेचे उत्पन्नही वाढत आहे. मात्र कालच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशभर दुखवटा पाळण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर तासगाव येथील आयोजित 'तासगाव महोत्सव' हा कार्यक्रमही आता रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
महोत्सवाची नवीन तारीख लवकरच कळवू : मुख्याधिकारी
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे तासगाव नगरपालिकेच्या वतीने आजपासून आयोजित केलेला 'तासगाव महोत्सव' हा कार्यक्रम तात्पुरता रद्द केला आहे. गेल्या चार वर्षांपासून हा महोत्सव अखंडितपणे सुरू होता. दरम्यान यावर्षीच्या 'तासगाव महोत्सवा'च्या नवीन तारखा लवकरच रसिकांना कळवू. नाटक व इतर कार्यक्रमाबाबत रसिकांना लवकरच माहिती देऊ, असे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.