जत : जत तालुक्यात प्रस्थापितांनी आजवर वंचित भागांना शाश्वत पाणी न दिल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. परंतु विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम गतीने सुरू आहे. बेडगपासून जत तालुक्यातील मल्लाळपर्यंत १०२८ कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत. ५४ किलोमीटरपैकी ३३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ९७९ कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जत तालुक्याच्या शिवारात येत्या डिसेंबरअखेर विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी मिळेल, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
जत तालुक्यात विस्तारित म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शंका व सूचना जाणून घेण्यासाठी सिंदूर, मुचंडी, संख, माडग्याळ येथे अधिकाऱ्यांसमवेत बैठका आयोजित केल्या होत्या. गावनिहाय प्रस्तावित कामांची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांची मते जाणून घेत कराव्या लागणाऱ्या कामांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुचंडी येथे झालेल्या बैठकीस सुभाष गोब्बी, संजय तेली, सरदार पाटील, रमेश देवर्षी, शशिकांत पाटील, लक्ष्मण जखगोंड, आकाराम मासाळ, महादेव अंकलगी, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, उपविभागीय अभियंता गणेश खरमाटे आदी उपस्थित होते. पडळकर म्हणाले, विस्तारित म्हैसाळ योजनेच्या ६५ गावांतील प्रस्तावित कामांचे सादरीकरण व्यवस्थितपणे करण्यात आले आहे. परिसरातील तलाव, नालाबांध, सिमेंटबंधारे किती भरणार आहेत, किती पाणी मिळणार आहेत, याव्यतिरिक्त काही शंका असल्यास त्यांचे निरसन करणे. ही आमची प्राथमिकता व जबाबदारी आहे. वंचित शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामांची माहिती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपलब्ध सहा टीएमसीपैकी दीड टीएमसी पाणी वंचित गावांतील तलाव भरण्याकरिता आरक्षित आहे.
त्याचबरोबर साडेतीन टीएमसीतून ओढे, नाल्यांवरील बंधारे भरण्यासाठी पाणी प्रस्तावित केले आहे. विस्तारित योजनेचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी बेडगपासून सुरू असलेल्या कामांची माहिती, निविदा प्रक्रिया, गावनिहाय असणाऱ्या तलावांची संख्या, पाणीसाठा, याबाबतची माहिती पॉवर प्रेझेंटेशनद्वारे दिली. नव्या योजनेमुळे किती लाभक्षेत्र ओलिताखाली येणार, मुख्य कालवे, शीर्ष कामे, प्रस्तावित कामाच्या क्षेत्रातील अडथळे, वन विभागाची मंजुरी, याबाबतची माहिती दिली.