कार्यकर्त्यांची अवस्था फिरत्या रंगमंचासारखी : ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ म्हणत सगळेच द्विधा मनस्थितीत
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपला 'टांग' मारत राष्ट्रवादी अजित पवार गटात उडी घेतली. या निवडणुकीत त्यांनी ज्यांना 'बाळ' म्हणून हिणवले त्या रोहित पाटलांनी त्यांना आस्मान दाखवले. पाटील यांचा लोकसभा व विधानसभेला अवघ्या चार - पाच महिन्यांच्या कालावधीत दोनदा पराभव झाला. सलग दोनदा मतदारांनी धूळ चारल्याने संजय पाटील गट अस्वस्थ आहे.
त्यातच पाटील यांचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते आता भाजपची सदस्य नोंदणी करत आहेत. त्यामुळे संजयकाका - अजितदादा यांच्यातील विधानसभेला झालेला 'प्रासंगिक करार' संपला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांच्या कार्यकर्त्यांची अवस्था तर 'फिरत्या रंगमंचा'सारखी झाली आहे. 'कोणता झेंडा घेऊ हाती' अशा द्विधा मनस्थितीत सर्वच कार्यकर्ते आहेत.
तासगावचे माजी आमदार स्व. दिनकरआबा पाटील यांचे पुतणे असलेल्या संजय पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सांगली येथून झाली. ते सांगलीचे माजी उपनगराध्यक्ष आहेत. मात्र पाटील यांना आजपर्यंत कोणत्याही एका पक्षात राहून स्थिर राजकारण करता आले नाही. लोकसभेचा अपवाद वगळता त्यांनी कधीही सलग निवडणुका एकाच पक्षाच्या चिन्हावर लढविल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे त्यांचे राजकारण नेहमी दोलायमान स्थितीत दिसून आले.
सांगलीच्या राजकारणातून 'एक्झिट' घेऊन त्यांनी तासगावच्या राजकारणात लक्ष घातले. तासगावमध्ये त्यांना माजी आमदार स्व. दिनकरआबा पाटील यांनी उभारलेला आयता गट मिळाला. हा गट टिकवण्यासाठी संघर्षाच्या काळात संजय पाटील यांनी परिश्रम घेतले. तासगाव येथील प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या आर. आर. पाटील यांच्याशी त्यांनी दोन हात केले. त्यांच्याबरोबर टोकाचा संघर्ष केला. विधानसभा निवडणुका लढविल्या.
मात्र या लढाईत संजय पाटील यांना एकदाही आर. आर. पाटील यांना चितपट करता आले नाही. त्यामुळे आर. आर. पाटील कुटुंबाचा एकदा तरी पाडाव करायचा या इराद्याने संजय पाटील नेहमीच पेटून उठलेले असायचे. मात्र त्यांना नेहमी निसटता पराभव स्वीकारावा लागत होता. सततच्या पराभवामुळे ते खचून गेले होते. नेहमी विरोधात राहून गट टिकविणे अवघड होते. त्यामुळे आर. आर. पाटील यांच्याशी त्यांनी हातमिळवणी करण्याचे ठरवले.
हे दोन नेते एकत्रित आले. त्यावेळी झालेल्या 'राजकीय तहात' संजय पाटील यांना विधानपरिषद व तासगाव कारखाना 'बहाल' करण्यात आला. मात्र दोघांची 'समझोता एक्सप्रेस' कशीबशी अवघी सहा वर्षे रुळावर होती. विधानपरिषदेचा कालावधी संपताच 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय पाटील यांनी पुन्हा आर. आर. पाटील यांच्याशी पंगा घेतला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
नरेंद्र मोदी यांच्या लाटेत त्यांनी सांगलीमध्ये वादळात दिवा लावण्याचे काम केले. 2014 व 2019 असे दोनवेळा ते भाजपमधून खासदार झाले. 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा त्यांना भाजपमधून खासदारकीची उमेदवारी मिळाली. मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांसह जिल्हाध्यक्षापासून अनेक आमदार, नामदारांना संजय पाटील यांनी गेल्या दहा वर्षाच्या काळात शिंगावर घेतले होते. पक्षांतर्गत अनेकांबरोबर त्यांचे वितुष्ट निर्माण झाले होते. त्यामुळे या मंडळींनी संजय पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत ठरवून 'गेम' केला. त्यांचा लाखाच्या फरकाने पराभव झाला.
या पराभवानंतर संजय पाटील काही महिने शांत राहिले. मात्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच त्यांनी पुन्हा 'कात' टाकली. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातून स्वतः ला किंवा चिरंजीव प्रभाकर पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्यासमोर रोहित पाटील यांची उमेदवारी 'फिक्स' होती.
मात्र रोहितसमोर आपला चिरंजीव प्रभाकर याचा टिकाव लागणार नाही, याची पुरेपूर जाणीव संजय पाटील यांना होती. मात्र गट टिकवण्यासाठी कोणीतरी लढलेच पाहिजे, हेही ते जाणून होते. त्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांनी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र महायुतीच्या जागा वाटपात तासगाव - कवठेमहांकाळची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाणार होती.
त्यामुळे सलग तीनवेळा लोकसभेची उमेदवारी देणाऱ्या भाजपाला 'टांग' मारून संजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. मुळात संजय पाटील यांना पक्ष बदलण्याची जुनी सवय आहे. त्यांनी अनेकवेळा पक्ष - अपक्ष असा प्रवास केला आहे. त्यामुळे कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा पक्ष बदलला. अजित पवार गटात प्रवेश करून 'घड्याळ तेच वेळ नवी' म्हणत नव्या 'इनिंग'ला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाला 'चावी' दिली. रोहित पाटील यांच्यासमोर तगडे 'आव्हान' उभे केले.
संजय पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती. तर रोहित पाटलांसाठी ती प्रतिष्ठेची ठरली होती. दोन्ही गटाकडून निवडणुकीत टोकाचे प्रयत्न करण्यात आले. मात्र या निवडणुकीत रोहित पाटील यांनी संजय पाटील यांना चितपट केले. कोरोना काळात संजय पाटील यांनी जोर - बैठका मारल्याचा व्हिडिओ 'व्हायरल' झाला होता. ते कसलेले पैलवान आहेत, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. तर निवडणुकीत त्यांनी रोहित याला मी 'आव्हान' मानत नाही. ते अजून 'बाळ' आहे, असे म्हणून हिणवले होते. मात्र याच पैलवानाला धूळ चारण्याचे काम रोहित पाटील नावाच्या बाळाने केले.
आर. आर. पाटील यांच्याकडून संजय पाटील यांचा पराभव चार - पाच हजारांच्या फरकाने होत होता. मात्र रोहित पाटील यांनी सुमारे 28 हजार मतांनी संजय पाटील यांना धूळ चारली. एका 25 वर्षाच्या 'बाळा'कडून झालेला पराभव संजय पाटील गटाच्या जिव्हारी लागला. पराभवानंतर हा गट पूर्णपणे विजनवासात गेला. राज्यात महायुतीची निर्विवाद सत्ता आली. त्यामुळे विधानपरिषद किंवा महामंडळ मिळेल, अशी भोळी आशा संजय पाटील यांना होती.
मात्र राज्यभरात अनेक प्रस्थापित 'वेटिंगवर' आहेत. त्यांनाच अद्याप काहीही मिळाले नाही. त्यामुळे या रथी - महारथींमध्ये संजय पाटील यांची 'अगरबत्ती' कुठे लागणार, हा सवाल आहे. परिणामी महायुतीकडून विधानपरिषद किंवा महामंडळ मिळण्याची आशा धूसर होत चालली आहे.
त्यामुळे संजय पाटील यांच्यासह त्यांचा संपूर्ण गट गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड अस्वस्थ आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार अजित पवार गटात जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास 'सासूसाठी वाटणी करायची आणि पुन्हा सासूच वाटणीला यायची', अशी परिस्थिती संजय पाटील यांच्यावर ओढवू शकते.
त्यामुळे संजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपचे वेध लागले आहेत. पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे अद्याप भाजपमध्येच आहेत. ते तासगाव - कवठेमहांकाळचे निवडणूक प्रमुख आहेत. भाजपची सध्या सदस्य नोंदणी सुरू आहे. सुरुवातीच्या काळात प्रभाकर पाटील अथवा त्यांचे कार्यकर्ते कुठेही सदस्य नोंदणीमध्ये दिसून आले नाहीत. मात्र ज्यावेळी भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते सदस्य नोंदणी करू लागले, त्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या, त्यावेळी प्रभाकर पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण भाजपमध्ये असल्याची व कमळाची आठवण झाली. त्यामुळे त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून सदस्य नोंदणी सुरू केली आहे.
एकीकडे संजय पाटील अद्याप राष्ट्रवादीतच आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय नियमाप्रमाणे राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे त्यांचा चिरंजीव भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या बाप - लेकांच्या या राजकारणात कार्यकर्त्यांची अवस्था मात्र 'फिरत्या रंगमंचा'सारखी झाली आहे. त्यांना 'कोणता झेंडा घेऊ हाती' हेच समजेना झाले आहे.
त्यातच संजय पाटील यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसासाठी विविध वृत्तपत्रांमधून तसेच बॅनरच्या माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. यातील बहुतांशी जाहिरातींवरून अजित पवार यांचे फोटो गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे संजय पाटीलही गेल्या अनेक दिवसांपासून द्विधा मनस्थितीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे.
मुळात संजय पाटील कोणत्याही एका पक्षात फार काळ स्थिर राहू शकत नाहीत, हा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा पक्ष बदलल्यास नवल वाटायला नको. पाटील यांचे कार्यकर्ते आत्ताच भाजपच्या सदस्य नोंदणीमध्ये सक्रिय असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाची ते वातावरण निर्मिती करत असल्याचे दिसून येत आहे.
परिणामी संजय पाटील व अजित पवार यांच्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला 'प्रासंगिक करार' संपुष्टात आला की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राजकारणात काहीच अशक्य नसते. कोण कधी कुठे जाईल याचा नेम नाही. त्याला संजय पाटील अपवाद असतील, असे नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची राजकीय वाटचाल स्पष्ट होईल.
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांवरही त्यांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर झाल्यास भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी बापलेकांमध्ये दुफळी होण्याऐवजी आत्ताच कमळ हातात घेतलेले चांगले, या भावनेतून संजय पाटील यांची भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र ते नेमके काय करणार, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.