रोगराई पसरण्याची शक्यता
जत : जत नगरपरिषदेचे प्रभाग क्र.८ मधिल गटार स्वच्छतेकडे दुर्लक्ष, ठिकठिकाणी गटारी तुंबल्याने येथिल रहिवाशांना करावा लागतो दुर्गंधीचा सामना,रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जत नगरपरिषद हद्दीतील सर्वच प्रभागातील गटारीच्या स्वच्छतेकडे जत नगरपरिषद आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे साथीचे आजार मोठ्याप्रमाणात पसरू लागले आहेत.जागोजागी गटारी तुंबल्यामुळे डासांचे साम्राज्य वाढले आहे.डेंग्यू व मलेरियाने खासगी दवाखाने भरु लागले आहेत.एवढे होऊनही जत नगरपरिषद यासंदर्भात उपाययोजना करताना दिसत नाही.
जत शहरात एवढ्या मोठ्याप्रमाणात साथीचे रूग्ण वाढलेले असतानाही जत नगरपरिषदेकडील आरोग्य विभाग शहरात डासप्रतिबंधक मोहीम राबवून शहरातील सर्वच प्रभागात धूरफवारणी का करित नाही असा सवाल शहरवासीय करित आहेत.जत शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधिल कोडग काॅम्प्लेक्स समोरील तानाजी भोसले यांच्या घरासमोरून जाणारी गटार वारंवार तुंबून या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा व रोगराईचा सामना करावा लागत आहे.पडोळकर व कोळी यांच्या घरासमोरील सांडपाणी नगरपालिकेच्या चुकीच्या केलेल्या कामामुळे रस्त्यावर पसरून मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येथील रहिवाशांवर येणार आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधिल जत नगरपालीकेच्या सार्वजनिक गटारी वारंवार तुंबत असल्याने या परिसरात मोठ्या दुर्गंधीला येथील रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.यासंदर्भात नगरपरिषदेकडे तक्रार करूनही ते तात्पुरती कामे केल्याचे दाखवित आहेत.या ठिकाणी विवाह कार्य,शासकिय कर्मचारी प्रशिक्षण, बाहेरून बंदोबस्तासाठी येणारा पोलीस कर्मचारी वर्ग अशा विविध स्तरातील नागरिकांचा वारंवार राबता असतानाही जत नगरपरिषद याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे.
जत शहरातील सर्वच प्रभागामधील सार्वजनिक शौचालये,गटारी व जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जत नगरपरिषदेकडे वारंवार यासंदर्भात आवाज उठवूनही नगरपरिषद त्याकडे लक्ष देताना दिसत नाही.त्यामुळे जत नगरपरिषदेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा ठेका घेतला आहे का असे म्हणावे लागत आहे.
जत शहरात गटारी तुंबल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.शहरात अनेक ठिकाणी गटारीची अवस्था झाली आहे.