जत : परिवर्तनवादी विचाराची कास जत तालुक्यातील जनतेत आहे. येत्या काळात जतचा दुष्काळ संपविण्याचा मानस आहे. निवडणुकीनंतर मंत्रालयात पंचायत समिती इमारतीचा अंदाजपत्रकीय आराखडा दिला आहे. निश्चितपणे त्यास मंजुरी मिळेल. त्याचबरोबर नगरपालिकेची इमारत अद्ययावत व सुसज्ज असावी, याकरिता येणाऱ्या काळात विस्तारित आराखडा तयार करीत आहोत. शहरासह तालुक्यातील प्रश्न सोडविण्यावर अधिकाधिक भर राहील, असा विश्वास नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
जत येथे आ.पडळकर यांची जत शहरातून मिरवणूक काढण्यात आली, तसेच हत्तीवरून पेढे, साखर वाटत, पेढेतुला करीत फटाक्यांची आतषबाजी करीत नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, दिल्ली सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, सरदार पाटील, सुभाष गोब्बी, रिपाइंचे नेते संजयराव कांबळे, संजय तेली, परशुराम मोरे, अण्णा भिसे, प्रभाकर जाधव, अतुल मोरे, विक्रम ताड, रमजान ऊर्फ बंटी नदाफ, गौतम ऐवाळे, संतोष मोटे, सद्दाम आत्तार, किरण शिंदे, रवी मानवर, हेमंत चौगुले, तेजस्विनी व्हनमाने, माजी नगरसेविका जयश्री मोटे उपस्थित होते.
आमदार पडळकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले, एकवेळ जत नगरपरिषद माझ्या ताब्यात द्या, मला शहरासाठी खूप काम करायचे आहे. जत शहराचा विकासाचा आराखडा बनवून त्यावर अधिकाधिक भर राहील. शहरातील घरकुल प्रश्रासंदर्भात आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. येत्या काळात घरकुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
फोटोओळी
जत : येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.