तासगाव(अमोल पाटील) : शेतकऱ्यांची घरं जाळून, त्यांच्या घरादारावर नांगर फिरवून मिळवलेल्या काळ्या पैशातून माजलेल्या कृषी दुकानदारांनी मागील आठवड्यात चक्क बारबाला नाचवल्या. त्यांच्यावर पैसे उधळले. घरातील आपल्या आई-वडिलांना व पत्नीलाही फसवून या दुकानदारांनी चक्क बारबालांसोबत रंग उधळले. याप्रकरणी तासगाव, जत, नाशिकसह अन्य भागातील सुमारे 20 दुकानदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस येताच बारबालांसोबतच्या रंगीत पार्टीतून अनेक दुकानदारांनी बुडाला पाय लावून पळ काढला होता. मात्र आता पार्टीत धिंगाणा घालणाऱ्या सर्वच दुकानदारांना पाचगणी पोलिसांनी नोटीस काढली आहे. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.
राज्यभरात गल्लीबोळातून कृषी औषधांच्या कंपन्या काढल्या जात आहेत. कुठेही पत्र्याचे शेड ठोकून त्यामध्ये औषधे उत्पादित केली जात आहेत. कृषी विभागाचे या कंपन्यांवर कसलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. कोणीही चहाची टपरी टाकावी, अशा पद्धतीने औषध कंपन्या सुरू करत आहे. त्यातच ‘पीजीआर’मध्ये मिळणारा नफा औषध कंपनीच्या मालकांना खुणावत आहे. अल्पावधीत श्रीमंत होण्याचा राजमार्ग सापडल्याने या कंपनीच्या मालकांनी आजपर्यंत कोट्यवधी रुपये मिळवले आहेत.
शेतकऱ्यांच्या माथी कसलेही उत्पादन मारून जगाच्या पोशिंदाला अक्षरशः नागवण्याचे काम करण्यात येत आहे. ही उत्पादने खपवण्यासाठी प्रत्येक कंपनीने सल्लागार नेमले आहेत. या सल्लागारांना 15 ते 20 टक्के कमिशन दिले जाते. याशिवाय त्यांना विविध ठिकाणी सहलीही आयोजित करून दिल्या जातात. अगदी विदेशातही ट्रीप दिली जाते.
बँकॉक, पटाया, थायलंड, दुबई अशा ठिकाणी जाऊन हे सल्लागार व कृषी दुकानदार आपले रंग उधळत असतात. त्या ठिकाणी जाऊन आपली ‘तलफ’ भागवून घेत आहेत. अनेक जण शरीराचा मसाज करून घेत स्वर्गसुख अनुभवण्याचा प्रयत्न करतात.
नुकतीच पाचगणी जवळील भिलार येथे कृषी दुकानदारांची रंगीत पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत चक्क बारबाला आणून नाचवल्या गेल्या. या बारबालांच्या अवतीभोवती कृषी दुकानदार अक्षरशः गरळ गाळत नाचत होते. घरी खोटे-नाटे काहीतरी सांगून हे दुकानदार फिरायला गेले होते. मात्र भिलार येथील रंगीत पार्टीत अनेक जण दारू ढोसून तर्र झाले होते. त्यांना पूर्व – पश्चिमही कळत नव्हते.
या रंगीत पार्टीवर पाचगणी पोलिसांनी अचानक छापा टाकला. त्यावेळी अनेकांची नशाच उतरली. तर अनेक जण साहित्य तिथेच टाकून अक्षरशः बुडाला पाय लावून पळून गेले. पण सुमारे 20 जण पोलिसांच्या ताब्यात सापडले. पोलिसांनी त्यांच्या गाड्या व साहित्य जप्त केले आहे. या 20 जणांपैकी पाचजण तासगाव तालुक्यातील आहेत.
चक्क बारबालांसोबत सापडल्याने या दुकानदारांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. घरातील मंडळींबरोबरच गावातील लोकही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. या दुकानदारांना तोंड दाखवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. त्यातच आता पोलिसांनी बहुतांशी कृषी दुकानदारांना नोटीस पाठवून पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे या दुकानदारांचे हृदयाचे ठोके वाढले आहेत. पुन्हा अब्रूचा बाजार मांडला जाणार, या विचाराने या कृषी दुकानदारांना अक्षरशः झोपही लागेना झाली आहे.