कुंकूचे महत्व जाणा !         

0
16

नुकताच मकर संक्रांत सण पार पाडला. त्यानंतर आता सर्वत्र हळदी कुंकू समारंभ साजरे केले जात आहेत. रथसप्तमी पर्यंत चालणाऱ्या या उत्सव काळात सर्वत्रच्या स्त्रिया उत्साहाने सहभागी होतात. विविध महिला मंडळे, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांसह राजकीय पक्षांच्या वतीने हळदी कुंकू समारंभ साजरे केले जातात. त्यानिमित्ताने स्त्रियांचे संघटन पाहायला मिळते. यावेळी स्त्रियांना तिळगुळ वाटपासह वाण म्हणून काहीनाकाही वस्तू दिली जाते. या सर्वांत प्रमुख कृती असते ती हळद आणि कुंकू लावण्याची. सौभाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून कपाळी हळद आणि कुंकू लावले जाते. स्त्रियांच्या दोन भुवयांमध्ये आज्ञाचक्राच्या स्थानी लावले जाणारे हळद कुंकू श्रद्धने लावले जाते. प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गादेवीचे तत्व असते त्यामुळेच स्त्रीला शक्ती असेही म्हणतात.

स्त्रिया एकमेकींना हळद कुंकू लावतात म्हणजे एकमेकांतील दुर्गादेवीच्या तत्वाचे पूजन करतात.  संपूर्ण चेहऱ्याच्या संवेदनांसाठी जबाबदार असणारा मज्जातंतू हा याच भागात असतो. दोन भुवयांच्या मध्यभागी मज्जातंतूच्या एकूण तीन शाखा असतात. या जागेवर दाब पडल्याने सायनसचा त्रास कमी होतो.  डोळ्यांच्या महत्त्वाच्या नसा देखील याच भागात असतात आणि या नसा डोळ्यांच्या स्नायुंशी जोडलेल्या असतात. या ठिकाणी थोडासा दाब दिल्यास दृष्टीही चांगली राहते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.  माणसाच्या मनावर ताण आला कि कपाळावर आठ्या पडतात. शरीरातला सगळ्या गोष्टींचा ताण हा कपाळावरील त्या बिंदूच्या ठिकाणी जमा होतो. म्हणूनच त्या बिंदूला थोडीशी उत्तेजना दिल्यास आपला ताण कमी होतो, दृष्टी सुधारते आणि निद्रानाशही कमी होतो. त्यामुळे बिंदूदाबन, योगशास्त्रदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्याही कुंकू लावण्याचे अनेक लाभ आहेत.

हळद आणि चुना किंवा हळद आणि लिंबू यांच्या मिश्रणतून कुंकू बनवले जाते. त्यामुळे कपाळी कुंकू लावण्याचे आयुर्वेदिक लाभही आहेत. या सर्वांमुळे भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांसह पुरुषांनीही कपाळाला कुंकू लावण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली पूर्वापार चालत आलेल्या लाभदायक प्रथा हळूहळू लोप पावत चालल्या असून जसे हल्लीच्या स्त्रिया साडी केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांना नेसतात तसे कुंकूही केवळ हळदी कुंकू समारंभातच लावू लागल्या आहेत. कुंकूची जागा आता टिकलीने घेतली असून हळूहळू तिही नष्ट होण्याच्या मार्गांवर आहे.

हल्लीच्या स्त्रियांवर हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीनचा प्रभाव अधिक असल्याने आज अनेक स्त्रिया उजाड माथ्याने वावरताना दिसतात. काहीजनी टिकली लावली तरी ती दुर्बीणीने शोधावी लागेल अशा आकाराची लावतात. आपल्या हिंदु प्रथा परंपरा या मानवाचे सर्वांगीण हित साधणाऱ्या असून त्या सर्वांमागे शास्त्र दडलेले आहे. आज ते विज्ञानाच्या आधारावरही सिद्ध होत आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन त्यांना त्यागण्यापेक्षा त्यांचा अवलंब करणे हिताचे आहे. हळदी कुंकू साजरी करण्याच्या प्रथेतील व्यापक दृष्टिकोन लक्षात घेऊन स्त्रियांनी प्रतिदिन कपाळावर कुंकू लावण्याची सवय स्वतःला लावून घायला हवी. 

सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here