तासगावात जुगाराचा अड्डा उध्वस्त | डीबी पथकाची कारवाई : 5 जुगाऱ्यांवर गुन्हा : 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
135

   येथील दत्त माळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला. हा अड्डा उध्वस्त करून सुमारे 1 लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  

जुनैद पैगंबर मकानदार (वय 22, रा. दत्तमाळ, तासगाव), अतुल हणमंतराव मुळीक (वय 36, रा. बेंद्री रोड, तासगाव), ऋषभ जितेंद्र मोरे (वय 20, रा. काशीपुरा गल्ली, तासगाव) अशरफ सलीम मुलाणी (वय 23, रा. विटा नाका, तासगाव) विनायक सुधीर गुरव (वय 28, रा सिद्धेश्वर कॉलनी, तासगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

  

तासगाव शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर जुगाराचे डाव रंगतात. या खेळावर दररोज लाखो रुपयांचा चुराडा होतो. पोलिसांच्या नाकावर टिचून हा काळा कारभार सुरू असतो. दरम्यान, आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यात अवैध धंदे उध्वस्त करा, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. 

  त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पोलीसही कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी काळ्या धंद्यांवर कारवाया सुरू आहेत. येथील दत्तमाळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एका ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

    

पोलीस आल्याची कुणकुण लागतात अनेक जण बुडाला पाय लावून पळून गेले. तर पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 55 हजार 500 रुपये रोख रक्कम व तीन दुचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर सूर्यवंशी करत आहेत.

बडे धेंडे पळून गेले..!

येथील दत्तमाळावरील महावितरण कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर दररोज अनेक बडे धेंडे आपले नशीब आजमावतात. या जुगारावर ते लाखो रुपये उधळतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा जुगार अड्डा सुरू आहे. पोलिसांनाही याबाबत माहिती आहे. मात्र पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत होते, असा आरोप होत आहे. दरम्यान, बुधवारी रात्री पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी अनेक बडे धेंडे या ठिकाणी जुगार खेळत असल्याची चर्चा आहे. मात्र पोलीस आल्याची कुणकुण लागताच अनेक जण पळून गेले. तर काहींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी सहकार्य केले, अशीही चर्चा आहे. पळून गेलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here