दुष्काळ,पाणीप्रश्नासाठी बसवराजकाकांनी संघर्ष केला | – शरद पवार | संखमध्ये भव्य पुतळ्याचे अनावरण

0
595

संख : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील संख या गावात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष,लोकनेते स्व. बसवराज सिद्धगोंडा पाटील यांच्या पुतळ्याचं राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक,जेष्ठ नेते शरद पवार यांनी अनावरण केलं; त्यांना श्रद्धांजली अर्पित केली व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कर्नाटकचे मंत्री नामदार शिवानंद पाटील,परमपुज्य श्री गुरूपाद ‌शिवाचार्य महास्वामीजी गुड्डापूर,परमपुज्य डॉ.महेश देवरू,गुरूबसव विरक्त मठ संख,खासदार विशाल पाटील,आ.जयंतराव पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील,आमदार अरुण लाड,आमदार रोहित पाटील,आमदार विनय कुलकर्णी, माजी आमदार विक्रमसिंह सावंत,विलासराव जगताप,प्रकाश जमदाडे,मन्सूर ‌खतीब,अमोल डफळे,चन्नाप्पा होर्तीकर,तम्मनगौडा रवीपाटील,सुजय शिंदे,संखचे सरपंच सुभाष पाटील यांच्यासह अन्य सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, मला आठवतंय की, एकदा कधीतरी बसवराज पाटील यांच्या आग्रहाने या ठिकाणी माझी एक भेट झाली होती. माझ्या या सगळ्या भेटीमध्ये दुष्काळी भाग आणि पाण्याचा प्रश्न यासंबंधी आमच्या भेटीमध्ये अतिशय आग्रहाने भूमिका या ठिकाणी कोणी मांडली असेल तर बसवराजकाका यांची आठवण ही मला करावीच लागते.कर्नाटक राज्य, शेजारचे राज्य आहे. आम्हा सगळ्यांचे साथी आहेत, अनेक लोक आम्हा लोकांचे मित्र होते. मला आठवतंय की, माझ्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना 1958 च्या कालखंडामध्ये रामकृष्ण हेगडे, देवराज अर्स हे आम्हा लोकांच्या मैत्रीचे धागे होते. देवराज अर्स हे शेतकऱ्यांच्या सुख दुःखाशी समजूत घालणारे एक आगळे वेगळे नेते होते.रामकृष्ण हेगडे कितीही संकटं आली त्या संकटांवर मात करून आपलं राज्य पुढे कसा नेता येईल? याचा अखंड प्रयत्न हा त्यांच्याकडून त्या कालखंडामध्ये होत होता. 

शरद पवार म्हणाले,त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये दोन आमचे अतिशय ज्येष्ठ नेते ज्यांनी कार्यकर्ते उभे केले, कार्यकर्त्यांना शक्ती दिली, राजकारणात संघर्ष असेल पण माणसं जोडणं, त्या माणसाला त्याच्या गुणांची ओळख करणं आणि गुण जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहित करणं हे काम आयुष्यभर महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी केलं. त्याच्यामध्ये वसंतदादा पाटील, राजाराम बापु पाटील यांच्या नावांचा उल्लेख हा करावाच लागेल.सुरुवातीच्या काळामध्ये बापुंनी देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्यासमवेत प्रचंड पदयात्रा काढली. तरुणांना एकत्र केलं आणि लोकांचं दुखणं मांडण्याचं काम केलं. त्याच कामामध्ये सहकाराचा आधार घेऊन वसंतदादा हे काही संस्था उभ्या करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या आयुष्यात त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने केला.म्हणून या दोन नेत्यांना राजाराम बापु या व्यक्तीमत्वाचं आणि बसवराज काका यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध हे मी स्वतः पाहिलेले आहेत.बापुंनी लोकांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी संघर्ष केला. पण कार्यकर्त्यांना शक्ती देणे, प्रतिष्ठा वाढवणं हे अत्यंत मोलाचं काम बापूंनी आपल्या आयुष्यामध्ये केलं.

त्याच्यामध्ये ज्या कर्तुत्ववान कार्यकर्त्यांची मालिका ही जी समाजात उभी केली त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातून बसवराज काका यांची आठवण ही निश्चित करावी लागेल.म्हणून लोकांच्या सुखदुःखाची काळजी घेणं हे काम या नेतृत्वाने अखंड केलं. 

शरद पवार म्हणाले,मी कधीतरी या भागातून येतो, मला आणखी एक काम आठवतं.या देशातील द्राक्ष उत्पादक त्यांची एक संघटना आम्ही लोकांनी उभारली. त्या संघटनेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातून उत्तम शेतकरी घेतले आणि त्या उत्तम शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जत तालुका,संख भाग याचा उल्लेख हा करावा लागेल. प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याच्यावर मात करून उत्तम प्रकारची फळबागांची शेती करण्याबद्दलचे काम या भागातील कष्टकरी शेतकऱ्यांनी केले.अशा कामांना बसवराज काका यांचं प्रोत्साहन होतं.मला आनंद आहे की, त्यांची पुढची पिढी आणि त्यांचे सहकारी वडिलांचा हा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या वडिलांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची सेवा केली त्याच पद्धतीने या भागातल्या काळ्या आईशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्यांशी जवळीक ठेवून त्यांना प्रोत्साहन देणे हे काम सुभाषचंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत.तुमची माझी जबाबदारी आहे की, आपण या नव्या पिढीला पूर्ण मदत करू, प्रोत्साहन देऊ आणि त्यांच्यामार्फत वडिलांचं अपूर्ण राहिलेलं जे काही काम असेल त्याची पूर्तता आपण करून घेऊ, हीच खऱ्या अर्थाने बसवराज पाटील यांना श्रद्धांजली होईल. या ठिकाणी मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो.

जयंत पाटील म्हणाले,जिल्ह्याच्या विकासाला खेचून आणणारे, जतच्या विकासासाठी ध्यास घेतलेले नेते म्हणून बसवराज काकांना आपण जवळून पाहिले आहे. नेहमी अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्याचे काम त्यांनी केले. जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत. आपल्या लोकांसाठी शंभर खेटा घालण्याची त्यांची तयारी असायची. जिल्हा परिषद, पंचायत समिती, संस्था उभारणी सर्वच ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. जत मधील ६५ गावांचा पाणी प्रश्न सोडवा ही मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली. स्व. बसवराज काकांसोबतच इतर सर्वांनी दिलेल्या संघर्षाने आज आपल्याला त्याची फळे मिळत आहेत. स्व.बसवराज काका यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्व. राजारामबापू पाटील यांच्यासह काम सुरू केले. ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. शेतीसाठी पाणी, शेतीसाठी वीज, रस्ते असा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते कार्यरत राहिले. शेतकऱ्यांना जपणारे नेते असा त्यांचा आदर्श आपण जपावा, ही सदिच्छा!

संख येथील लोकनेते बसवराज पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे नेते शरद पवार यांच्याहस्ते संपन्न झाले.यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here