‘पद्ममविभुषण’, ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
45

महाराष्ट्रातील पुरस्कारार्थींचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि प्रसिद्ध गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तर अभिनेते शेखर कपूर या तिघांना ‘पद्मविभुषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘महाराष्ट्र भुषण’ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, नागपूरचे होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, अरुण्यऋषी मारुती चितमपल्ली, वन, वन्यजीव संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले चैत्राम पवार यांच्यासह अकरा मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील समाजकारण, कला, साहित्य, चित्रकला, वैद्यकीय, वनसंवर्धन, कृषी, उद्योग आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. जोशी सरांना अभिवादन करतानाच ज्येष्ठ गायक पंकज उधास यांनाही हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिवादन करीत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भुषण अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट, नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध करीत त्यांच्यावर अधिराज्य गाजवले आहे. अच्युत पालव यांनी आपल्या ४० वर्षाच्या कारकीर्दीत सुलेखन क्षेत्रात नाव कमवले आहे. नागपुरचे ७० वर्षीय होमिओपॅथिक डॉक्टर विलास डांगरे यांनी ५० वर्षांहून अधिक काळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना नाममात्र शुल्कात उपचार केले आहेत. विदर्भात त्यांची ओळख वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी आहे.

प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी अशी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची ओळख संपूर्ण देशाला आहे. चैत्राम पवार यांनी वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी दखल घेऊन त्यांना यंदाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पहिलाच वनभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

तर चित्रकार वासुदेव कामत, गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, जसपिंदर नरूला, रानेंद्र मुजुमदार, अरुंधती भट्टाचार्य, सुभाष शर्मा यांनी देखील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर झळकल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here