अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेऊन ३० दिवसही उलटले नाहीत तोवर धडाकेबाज निर्णय घेऊन जगाला हादरवून सोडले आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतच त्यांनी अमेरिका फर्स्ट ही घोषणा केली होती. अमेरिकेच्या हितासाठी जे काही करता येईल ते मी करेल त्यासाठी जगाशी लढावे लागले तरी बेहत्तर अशी घोषणा त्यांनी निवडणूकी दरम्यान केली होती त्यांच्या याच घोषणेमुळे ते निवडून आले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी त्या दिशेने पावले टाकली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडा या देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के तर चीन मधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त कर लावला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मेक्सिको , कॅनडा आणि चीन या देशांनाच नाही तर जगाला ही हादरा बसला आहे . कारण त्यांच्या या निर्णयामुळे आता जगात व्यापार युद्ध सुरू होईल अशी चिंता जाणकारांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने या तिन्ही देशांवर लावलेल्या अतिरिक्त करांना या तिन्ही देशांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाडिया शिणबन यांनी आपल्या अर्थमंत्र्यांना देशहितासाठी अमेरिकन वस्तूंवर अतिरिक्त कर लावण्यास सांगितले आहे.
कॅनडाने अमेरिकेचा निषेध व्यक्त करत अमेरिकन वस्तूंवर तितकाच म्हणजे २५ टक्के अतिरिक्त कर लावण्यात येईल असा इशारा दिला आहे. चीनही जागतिक व्यापार संघटनेमध्ये ट्रम्प यांना आव्हान देऊन प्रतीकात्मक पाऊल उचलण्याची शक्यता आहे. जगातील या चार मोठ्या देशात एक प्रकारे हे व्यापार युद्धच सुरू झाले आहे त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो परिणाम महागाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते. ट्रम्प यांच्या या निर्णयाने जगातील सर्वच मोठ्या देशांचे धाबे दणाणले आहे. ट्रम्प यांची वक्रदृष्टी केंव्हाही आपल्यावर पडू शकते अशी भीती अनेक देशांना वाटू लागली आहे. भारताने याबाबत जाहीरपणे चिंता व्यक्त केली नसली तरी भारतातही या निर्णयाचे सावट पसरले आहे. भारताने या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही मात्र भारत सावध पावले टाकत आहे हे नक्की. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्यावेळी चर्चेत हा मुद्दा येऊ शकतो मात्र सध्या तरी भारताने सावध राहायला हवे. ट्रम्प कधी कोणता निर्णय घेतील याचा नेम नाही. आधीच त्यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ट्रम्प अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत.
अमेरिकेत कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून संबोधले जाते. प्यू रिसर्च च्या अहवालानुसार अमेरिकेत ७. २५ लक्ष बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित राहतात या बाबतीत भारत मेक्सिको आणि साल्वाडोर नंतर तिसऱ्या स्थानावर आहे. एका वृत्तानुसार अमेरिकन प्रशासनाने अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या भारतीयांना भारतात परत पाठवण्यासाठी एक योजना आखली असून त्यासाठी त्यांनी एक खास लष्करी विमान तयार ठेवले आहे. राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जगात व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे त्यामुळे जगभर खळबळ माजली आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
ReplyForwardAdd reaction |