आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी गावात दाखल
शिवनाकवाडी ता.शिरोळ या गावात महाप्रसादातून ३०० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे.विषबाधेनंतर नागरिकांना त्रास होऊ लागल्यानंतर त्या इंचलकरजीतील आयजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.गावात जिल्हा आरोग्य विभागाकडून उपाययोजना केली जात आहे.
मंगळवारी (दि.४) शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावचे ग्रामदैवत कल्याणताई माता देवीची यात्रा होती. या यात्रेसाठी शिवनाकवाडी शिरदवाड यासह जिल्ह्यातून भाविक भक्त दाखल झाले होते. मंगळवारी मध्यरात्रीपासून गावातील प्रत्येक घरात उलट्या, जुलाबाचा त्रास नागरिकांना सुरू झाल्यानंतर गावातील खासगी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकांनी उपचार घेतले.
बुधवारी पहाटेपर्यंत गावातील तीनशेहून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याचं स्पष्ट झालं आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी तालुक्यातील सर्व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ शिवनाकवाडी गावात येण्याच्या सूचना केल्या. यानंतर गावातील प्रत्येक घरात आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली.
यातील अत्यावश्यक शंभर जणांना इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं तर गावात जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी दाखल झाले,अन्य कोणाला विषबाधा झाली आहे का यांचाही शोध घेतला जात आहे.