जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर होणार कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
सांगली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व 10 लाख लाभार्थ्यांना एक क्लिक वर पहिला हप्ता वितरण कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.45 वाजता बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर घरकुल मंजूर लाभार्थ्यांना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दिसण्याबाबत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जनतेने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन हा गृहोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय कार्यक्रम पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा मॅरेज हॉल, पोलीस मुख्यालय विश्रामबाग, सांगली येथे दुपारी 3.30 वाजता लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत 500 लाभार्थी, तालुकास्तरीय कार्यक्रम संबंधित आमदार यांच्या अध्यक्षतेखाली 300 लाभार्थी व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचे आयोजन करून सरपंच, आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये 70 ते 100 लाभार्थी यांचा मेळावा तसेच ग्रामसभा घेण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण-2 अंतर्गत 31 हजार 946 इतक्या घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त असून 100 टक्के मंजुरी व प्रथम हफ्ता वितरणाची कार्यवाही सुरु आहे. राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत स्तरावर दिसण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्क्रीन, एलसीडी प्रोजेक्टर व इंटरनेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.