प्रशांत केदार यांची मागणी : दलित महासंघाची आयुक्तांकडे तक्रार
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. कोणाचा कोणाला पायपोस नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शिक्षकांवर दबाव राहिलेला नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांच्या संपूर्ण कार्यालयीन कारभाराची चौकशी करा. त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी दलित महासंघ (मोहिते गट) जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी शिक्षण आयुक्त सिंह यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केदार यांनी म्हटले आहे, तासगाव तालुक्यातील काही जि. प. शाळांचा मनमानी कारभार सुरू आहे. तालुक्यात निमनी - नेहरूनगर व बस्तवडे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये खाजगी शिक्षिका नेमणे, रजा न घेता गैरहजर राहणे, अध्यापन न करणे, बोगस पगार काढणे असे प्रकार घडले आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांनी तासगाव पदभार स्वीकारलेपासून खुर्ची न सोडली नाही. जि. प. शाळेच्या तपासण्या केल्या नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेतल्या नाहीत. काही शाळामधील शिक्षकांचा मनमानी गैरकारभार कानावर येऊनही त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. लावंड यांनी वेळीच आपली प्रशासकीय कर्तव्ये, जबाबदारी पार पाडली असती तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाची बदनामी टळली असती.
जिल्हा परिषद शाळांमध्ये बारा-बलुतेदार समाजातील गोर-गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास असणारी मुले शिक्षण घेतात. त्या मुलांच्या पालकांची जि. प. शिक्षकांकडून मोठ्या अपेक्षा असतात. परंतू शिक्षक मात्र मनमानी करीत राजकारण व अशैक्षणिक कामात व्यस्त आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजातील मुलांचे उज्ज्वल भविष्य, हे दिवास्वप्न ठरत आहे. याचे कसलेही सोयरे-सुतक गटशिक्षणाधिकारी लावंड यांना नाही.
शाळा हे मंदिर असून ज्ञानदान हे पवित्र कार्य मानले जाते. त्यासाठी ज्ञानदानासाठी शिक्षकांना शासनाकडून गलेलठ्ठ पगार दिले जातात. मात्र तरीही तालुक्यातील काही शिक्षक गटशिक्षणाधिकारी यांच्या आशीर्वादाने जि. प. शिक्षण क्षेत्राला गालबोट लावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांना पाठीशी घालणाऱ्या आबासाहेब लावंड यांच्या संपूर्ण कार्यालयीन कारभाराची चौकशी करावी. त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी निवेदनात प्रशांत केदार यांनी केली आहे.