जत : समाज माध्यमाच्या या युगात तरुण विद्यार्थी सैरभैर झाले असून विद्यार्थ्यांनी शिक्षण, आरोग्य व करिअरकडे लक्ष दिले पाहिजे. तरूण वयातच व्यक्तिमत्व विकास होतो व आयुष्याचा खरा आनंद घेत जीवन खुलते, असे प्रतिपादन जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अन्सार शेख यांनी व्यक्त केले.
ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष डॉ.रामदास बनसोडे उपस्थित होते.
अधिक बोलताना अन्सार शेख म्हणाले की, कळत- नकळत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याकडून चुका होत असतात. आपले आई-वडील व शिक्षकांनी दिलेला उपदेश व मार्गदर्शन याचा विचार करून भविष्यात होणाऱ्या नुकसानीची जाण ठेवून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रामदास बनसोडे यावेळी म्हणाले की,आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण सर्वोच्च ध्येय मनामध्ये ठेवून नियोजनबद्ध वाटचाल केली पाहिजे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके यांनी केले. सूत्रसंचालन कु. अमृता अकुल तर आभार प्रा. धनंजय वाघमोडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. प्रकाश माळी, राजेंद्र खडतरे, दादासाहेब रणदिवे, लता करांडे, रोहिणी शिंदे, देवयानी करे, प्रज्ञा थोरबोले, डॉ. आण्णासो गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.