१० लाख रोख रक्कम, सन्माचिन्ह, सन्मानपत्र देऊन होणार गौरव
बिळूर : आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत तालुकास्तरावरील पहिला पुरस्कार जत तालुक्यातील बसरगी या गावाला जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतीचा आता दहा लाख रोख रक्कम, सन्माचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव होणार आहे.जिल्हा परिषदेकडून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण रक्षण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर अशा मुद्द्यांवर १०० गुण देऊन प्रत्येक तालुक्यातून एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतीची आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजनेसाठी निवड करण्यात येते.तालुकास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला पुरस्कारात प्रत्येकी दहा लाख रुपये तर जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतीसाठी ४० लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे.
प्रत्येक कुटुंबाकडे स्वच्छतागृह, दारूबंदी, प्लॅस्टिक बंदी, वृक्ष लागवड, शाळा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, ग्रामपंचायतीची ऑनलाइन सुविधा, बचतगटांशी अधिकाधिक महिला संलग्न, ग्रामपंचायतीचा कर १०० टक्के वसूल, असे काही निकष या पुरस्कारासाठी लावले जातात. त्याशिवाय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवकांनाही पुरस्कार दिला जातो. त्यांचीही निवड करण्यात आली.जत तालुक्यातील सिमावर्ती असलेल्या बसरगीला यंदा तालुक्यात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.सरपंच शिवाप्पा तावशी,उपसरपंच गुरूबाई काडप्पा पटेद,ग्रामपंचायत अधिकारी श्री आर ए ननवरे यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे यश मिळाले असून त्यांना
ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, सोसायटी चेअरमन चंद्रकांत बामणे,व्हॉईस चेअरमन शिवानंद पटेद सर्व सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी,सर्व माजी सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती,प्रा.आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी,शाळातील शिक्षक,विविध मंडळाचे पदाधिकारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स यांचे विशेष सहकार्य लाभले.तालुका अतंर्गत तयारीसाठी गटविकास अधिकारी आनंद लोकरे,सह.गटविकास अधिकारी श्री.माडगूळकर, विस्तार अधिकारी श्री. गुरव,श्रीशैल बिरादार,श्री.मंडले,श्री. संकपाळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.