तहसीलदारांची माहिती : जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवणार
तालुक्यातील कवठेएकंद येथील जनाधार महा-ई-सेवा केंद्रात एका विद्यार्थिनीच्या गॅप सर्टिफिकेटच्या प्रतिज्ञापत्रावर चक्क तहसीलदारांची बोगस सही करण्यात आली होती. याप्रकरणी सेतू चालक दीपक सरगर याला नोटीस काढली आहे. शिवाय सेतूची तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवणार आहे, अशी माहिती तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली.
कुमठे (ता. तासगाव) येथील मृणाली महादेव पाटील या विद्यार्थिनीने गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र केले होते. तिला तात्काळ गॅप सर्टिफिकेट हवे होते. त्याचाच गैरफायदा घेत सेतू चालक दीपक सरगर याने जादा पैशाच्या हव्यासापोटी प्रतिज्ञापत्रावर चक्क तहसीलदारांची बोगस सही ठोकली. शिवाय हे प्रतिज्ञापत्र तहसील कार्यालयातील रजिस्टरला नोंदवलेही नाही.
दरम्यान, आपल्या पुढील शैक्षणिक कामासाठी संबंधित विद्यार्थिनीने हे गॅप सर्टिफिकेट एका महाविद्यालयात दिले. मात्र संबंधित महाविद्यालयातील प्राचार्यांना सर्टिफिकेटवरील तहसीलदारांची सही बोगस असल्याची शंका आली. त्यांनी या सहीबाबत चौकशी सुरू केली.
या प्रतिज्ञापत्रावर तहसीलदारांची सही बोगस असल्याची तक्रार येथील तहसील कार्यालयामध्ये दाखल झाली आहे. या तक्रारीची तहसीलदार अतुल पाटोळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कवठेएकंद येथील जनाधार महा-ई-सेवा केंद्राचा चालक दीपक सरगर याला याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.
याप्रकरणी सरगर याच्याकडून याबाबतीत खुलासाही घेण्यात आला आहे. शिवाय या सेतूची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्यामार्फत सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली.