– मानसिंगराव नाईक : जतला सोसायट्यांचा गौरव सोहळा
जत : राज्यातील सहकारी बँकांमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही टॉप फाईव्हमध्ये आहे, आता आमची स्पर्धा नंबर एकवर जाण्यासाठी सुरू असून, शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मृगजळामागे न लागता ती वेळेत परतफेड केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांसह बँक आणि सहकारी सोसायट्यांना देखील चांगला होतो. यंदा जतमधील चौदा सोसायट्या शंभर टक्के वसुल झाल्या आहेत, ही संख्या खूपच कमी असून, पुढच्या वर्षी किमान हा आकडा ४० वर गेला पाहीजे यादृष्टीने काम करावे असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांनी केले.
जत तालुक्यातील सभासद पातळीवरील १२ आणि बँक पातळीवर दोन अशा चौदा सोसाट्यांचा गौरव सोहळा येथे पार पडला. यावेळी चेअरमन नाईक बोलत होते. या सोहळ्यास माजी आमदार विलासराव जगताप, विक्रमदादा सावंत, जमदाडे मन्सूर खतीब, राम सरगर, एम.डी. शिवाजीराव वाघ,रामण्णा जिवण्णावर, शिव तावंशी, भैय्या कुलकर्णी, प्रमोद सावंत, रवींद्र सावंत, धनाजी यादव, मंगेश सावंत, योगेश व्हनमाने, अविनाश गडीकर, अधिकारी राजू कोळी, तानाजी काशिद, नामदेव कांबळे, प्रशांत हिरेमठ, राहुल काळे, सोमनाथ मठपती, मिलींद कुलकर्णी, बसवराज चव्हाण, सुनीता सावंत, प्रियंका नरळे, गीता बुध्दयाळ यांच्यासह तालुक्यातील सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव आदी उपस्थित होते.
चेअरमन नाईक म्हणाले, बँकेत गेल्या तीन वर्षापूर्वी आमची सत्ता आल्यापासून प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. बँकेत जरी वेगवेगळ्या पक्षाचे संचालक असले तरी आम्ही बँकेच्या प्रगतीत मात्र कसलेही राजकारण आणले नाही. सर्वच संचालक एकविचाराने या संस्थेच्या प्रगतीसाठी काम करत आहेत. यामुळे सभासदांचा, ठेवीदारांचा मोठा विश्वास बँकेने संपादन केला आहे. आज आठ हजार कोटींच्या ठेवी बँकेकडे असून, पुढच्या वर्षी बँकेचे शतकमहोत्सवी वर्ष सुरु होत असून, याकाळात आम्ही दहा हजार कोटींकडे वाटचाल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्यावर्षी बँकेला १८६ कोटींचा नफा झाला, आता तो २१० कोटींवर नेण्यात येणार आहे. तसेच १६ हजार कोटींचा व्यवसाय बँकेने करत नेट एनपीए शुन्य तर ग्रॉस एनपीए साडे सात टक्क्यांनी कमी केला आहे.
विशेषता जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी निर्णय आम्ही घेतले. येथील संचालक प्रकाशराव जमदाडे, मन्सूर खतीब, राम सरगर यांचा या भागाला न्याय देण्याचा सतत आग्रह असतो. आम्ही खास जतसाठी ओटीएस योजना सुरू केली, त्याचा मोठा फायदा झाला. आता ज्या सोसायटीतील कर्जदार सभासद नियमीत आहे, त्याचे प्रकरण न अडवण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. शासनाच्या विविध महामंडळाचा लाभ आता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना होतो आहे. त्यामुळे शेतकरी, सभासद, सोसायट्या यांनी चांगल्या प्रकारे काम केल्यास अधिकचा फायदा देणे सोयीचे होणार आहे, त्यादृष्टीने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार विक्रम सावंत म्हणाले, जत तालुक्यात पाणी आल्याने आत चांगला बदल होतो आहे. शेतकरी मुददाम थकबाकीदार होत नाही, अनेकवेळा कांही परिस्थीती तशी बनते. त्यात कांही सचिव लोक शेतकरी आणि संचालक मंडळाला कांही कळू देत नाहीत, हा प्रकार थांबला पाहीजे. बँकेची धोरणं अतिशय चांगली आहेत, पण लवचिकता पण हवी असेही मत त्यांनी व्यक्त केले.
लोकशाही धोक्यात : विलासराव जगताप
माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, आज देशातील परिस्थीती अतिशय गंभीर आहे. लोकशाही बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. याच्या झळा तुमच्या पर्यंत येण्यास वेळ लागणार नाही. आपण निवडणुकांमध्ये कसे वागतो, याचा विचार करायला हवा. दोन चार लाखात होणारी निवडणुक ४० ते ५० कोटींवर गेली आहे. अगदी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही बेमाप पैशाचा वापर सुरू झाला. मग तुम्ही निवडणुकीनंतर त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा कशी करणार असे सांगून जोवर शेतकरी, मतदार जागरूक होणार नाही तोवर ही स्थिती बदलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वागत व प्रास्ताविक प्रकाशराव जमदाडे यांनी केले. यावेळी संचालक मन्सूर खतीब यांनी मनोगत व्यक्त केले. आभार राजू कोळी यांनी मानले.
जत तालुक्यातील १०० टक्के वसुली केलेल्या पदाधिकारी, सचिव व फिल्ड ऑफिसर यांचा सत्कार करण्यात आला.




