सुमारे ₹१५० कोटींचे नुकसान ; दोन दिवसांत मिळणार पहिल्या टप्प्यातील भरपाई
सांगली :ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पुरामुळे सांगली जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला असून, जिल्हाभरात सुमारे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर केला असून, आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत आणि खानापूर या दहा तालुक्यांतील सुमारे ९५ हजार हेक्टर शेती अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहे. यात मुख्यतः सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब आणि द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुरुवातीला प्रशासनाने सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रातील शेती बाधित झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवला होता. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने परिस्थिती आणखी बिकट झाली. उभी पिके कुजली, तर काढणी व मळणी झालेल्या धान्यालाही पावसाचा फटका बसला. द्राक्षबागांमधील द्राक्षेही कुजल्याने शेतकरीवर्गाचे प्रचंड नुकसान झाले.
पूर्वी शासनाने जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पिके बाधित असल्याचे नमूद केले होते; परंतु फेरसर्वेक्षणानंतर पलूस आणि कडेगाव तालुकेही बाधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. पंचनाम्यानुसार सुमारे ९५ हजार हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्क्यांहून अधिक शेतीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना भरपाई म्हणून सुमारे १५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी कळवले की, येत्या दोन दिवसांत पहिल्या टप्प्यातील भरपाईचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शासनाच्या आदेशानुसार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्यात येणार असून, निधी प्राप्त होताच वितरणाची प्रक्रिया सुरू होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चौकट
“शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. दोन दिवसांत पहिल्या टप्प्यातील भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल,असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.




