अंधश्रधेने नव्हे तर शास्त्रीय उपचारानेच कोरोनावर विजय मिळवता येईल
देशातच नव्हे तर जगभर कोरोनाने कहर केला आहे. भारतात तर कोरोनाने अक्षरशः हाहाकार उडवला आहे. अशा वेळी देशाला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्याची जबाबदारी केवळ सरकारचीच नाही जनतेनेही शहाणपणाने हा लढा लढायला हवा. कोरोनाविरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाला पर्याय नाही. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोरोनावरील लसीचा शोध लागला.
कोरोना हा एक नवीन विषाणू असला तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी फार कमी काळात बरेच संशोधन करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे असे असले तरी काही महाभाग मात्र अंधश्रद्धा पसरवून शास्त्रज्ञांच्या या अथक प्रयत्नांवर पाणी सोडत आहेत. कोरोनाकाळात अंधश्रद्धा पसरवणारे प्रकार वाढत आहे ते थांबायला हवे. कोरोना विरुद्धच्या लढाईत अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत आहे.कोरोनाचे निर्मूलन व्हावे यासाठी होमहवन, जपार्जन यासारख्या गोष्टी सर्रास सुरू आहेत. एककिडे लसीकरणाद्वारे कोरोनाशी लढा सुरू असताना दुसरीकडे धार्मिक मान्यतावर विश्वास ठेवून उपाय केले जात आहेत.मध्यप्रदेशातील राजगड येथे ट्रॉलीवर हवनकुंड ठेवून त्यात आहुती देण्यात येत आहे.
तामिळनाडूच्या कोईम्बतुरमधील एका मंदिरात तर थेट कोरोना देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. येथे सकाळ संध्याकाळ कोरोना देवीची पूजा केली जाते. जो व्यक्ती कोरोना देवीची नित्यनियमाने पूजा करेल त्याला कोरोना होणार नाही असा दावा येथील मंदिर प्रशासनाने केला आहे त्यामुळे या मंदिरात कोरोना देवीची पूजा करण्यासाठी भाविकांची झुंबड उडत आहे विशेष म्हणजे यावेळी कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाही. लॉक डाऊन असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हैदराबादच्या एका वैद्याने एक औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे त्याचे औषध डोळ्यात घातले की कोरोना होत नाही, ऑक्सिजन पातळी सुधारते असा त्याचा दावा आहे त्यामुळे हे औषध घेण्यासाठी तिथेही लोकांची झुंबड उडत आहे.गाईच्या शेणाने अंघोळ केल्यास कोरोना होणार नाही असे समजून काहीजण गायीच्या शेणाने अंघोळ करत आहे तर काहीजण गोमूत्र पिऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा दावा करत आहे.
कोणी मद्यपान, धूम्रपान करा म्हणजे कोरोना होणार नाही असा अशास्त्रीय आणि चुकीचा दावा करत आहे. गायत्री मंत्र म्हटल्याने कोरोना जवळ फिरकत नाही असा मेसेज सोशल मीडियावर फिरू लागल्यापासून अनेकजण सकाळ संध्याकाळ गायत्री मंत्राचा जप करत आहे. हे सर्व प्रकार अशास्त्रीय आणि अंधश्रद्धा पसरवणारे आहेत हे माहीत असूनही याचा सर्रास वापर केला जात आहे. विषेश म्हणजे काही लोकप्रतिनिधी देखील याचे जाहीरपणे समर्थन करत आहेत. आजही देशातील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पोहचल्या नाहीत तिथे मांत्रिक आणि बुवाबाजांची चलती आहे. लोकांच्या श्रद्धेचा वापर करून समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचे काम हे मांत्रिक आणि बुवाबाज करत असतात. लोकही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेत नाही. श्रध्दा आणि अंधश्रद्धेच्या या खेळात अनेकांचे प्राण जात आहे. हे थांबवले पाहिजे. अंधश्रध्येने नव्हे तर शास्त्रीय उपचारानेच कोरोना विरुद्धचा लढा जिंकता येईल हे लोकांनी लक्षात घ्यावे. सरकारनेही जनतेची दिशाभूल करून अशास्त्रीय तसेच चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर व त्याचे समर्थन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
9922546295