अपहरण करून झाडाला बांधून जाळले; ५४ दिवसांच्या झुंजीनंतर इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

0
5

चंदीगड : पंजाब-चंदीगड परिसराला हादरवून सोडणाऱ्या घटनेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपहरण करून तिला झाडाला बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिच्यावर चंदीगड येथील PGIMER रुग्णालयात उपचार सुरू होते.

मनजीत कौरने तब्बल ५४ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र, उपचारादरम्यान २६ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

मनजीतच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर चंदीगड पोलिसांनी अपहरण आणि हत्येसह भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. तपासातून या अमानुष कृत्यामागील संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

५४ दिवस मृत्यूशी झुंज देऊनही मनजीत कौरचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here